मंडणगडमध्ये महिलांची मोठी फसवणूक! दागिने सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्याने २.७१ लाखांचा ऐवज लंपास; आरोपी पसार

मंडणगड (रत्नागिरी): मंडणगड तालुक्यातील दाभट येथे महिलांच्या विश्वासाला तडा देणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘मिटिंगला जाताना दागिने सोबत नेू नका’ असे सांगून, ६ महिलांचे दागिने आणि मोबाईल एका लिफाफ्यात ठेवायला लावून एका भामट्याने तब्बल २ लाख ७१ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ९ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास दाभट येथे घडली. फिर्यादी राजश्री विवेक गायकवाड (रा. विन्हे, ता. मंडणगड) आणि त्यांच्यासोबत इतर ६ महिलांना एका मिटिंगसाठी माणगाव येथे जायचे होते. यावेळी आरोपी चंद्रकांत घाणेकर (रा. तेवरे, ता. चिपळूण, सध्या रा. नाशिक) याने महिलांची दिशाभूल करण्यास सुरुवात केली.

विश्वासघात करून दागिन्यांवर डल्ला

“तुम्हाला मिटिंगसाठी बाहेर जायचे आहे, तिथे दागिने नेणे सुरक्षित नाही, ते ऑफिसमध्ये ठेवा,” असे सांगून आरोपीने महिलांचा विश्वास संपादन केला. खालील महिलांनी आपले सोन्याचे दागिने आणि मोबाईल एका लिफाफ्यात घालून चंद्रकांत घाणेकर याच्याकडे सोपवले: १) समीधा समाधान येरवणकर २) साक्षी शंकर सोडकर ३) जागृती निवृती तांबुटकर ४) तेजस्वी मोहन सुतार ५) सानिका रमेश गायकवाड ६) सायली पांडुरंग यादव

मात्र, आरोपीने हे दागिने ऑफिसमध्ये न ठेवता, तो लिफाफा घेऊन तिथून पळ काढला. महिलांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच परिसरात एकच गोंधळ उडाला.

गेलेला माल (एकूण २,७१,१०० रुपये):

चोरट्याने लंपास केलेल्या मालामध्ये प्रामुख्याने खालील वस्तूंचा समावेश आहे:

  • साक्षी सोंडकर: १ तोळे ८ ग्रॅमचे मंगळसूत्र (१ लाख रु.), ५ ग्रॅमचे छोटे मंगळसूत्र (३३ हजार रु.), सोन्याचे झुंबर (१६ हजार रु.) आणि सिमकार्ड.
  • समीधा येरवणकर: सोन्याचे टॉप्स (१३ हजार रु.) आणि १० हजार रुपयांचा ओपो मोबाईल.
  • जागृती तांबुटकर: कैरीच्या आकाराचे सोन्याचे झुमके (२० हजार रु.).
  • तेजस्वी सुतार: ५ ग्रॅमचे सोन्याचे गंडा (३३ हजार रु.).
  • सानिका गायकवाड: ७ ग्रॅमची सोन्याची चैन (४६ हजार रु.).

पोलीस कारवाई

याप्रकरणी राजश्री गायकवाड यांनी १० मार्च २०२६ रोजी रात्री ८.१२ वाजता तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी चंद्रकांत घाणेकर विरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१६(३) (फौजदारी पात्र न्यासभंग) आणि ३१८(४) (फसवणूक) अन्वये गुन्हा (रजि. नं. २६/२०२६) दाखल केला आहे.

महिलांनी अनोळखी किंवा कमी ओळखीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून आपले दागिने सोपवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. मंडणगड पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.