चिपळूण (रत्नागिरी): चिपळूण तालुक्यातील कुटरे-गुरववाडी येथे नमनाच्या कार्यक्रमादरम्यान बक्षिसाच्या रकमेवरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले आहे. बक्षिसाचे पैसे देऊनही नमनवाल्यांनी नाव पुकारले नाही, या रागातून एका तरुणाने आणि त्याच्या साथीदाराने मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीलाच बेदम मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले असून, सावर्डे पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी पहाटे २.३० च्या सुमारास कुटरे गुरववाडी येथील गावाच्या सहाणेवर नमनाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी आरोपी आकाश चंद्रवदन जगदाळे याने नमन करणाऱ्या कलाकारांना बक्षीस म्हणून काही पैसे दिले. मात्र, नमन करणाऱ्या लोकांनी त्या बक्षिसाची रितसर पुकारणी केली नाही. आपले नाव पुकारले गेले नाही याचा राग आकाश जगदाळे याला आला आणि त्याने नमनवाल्यांशी बाचाबाची करण्यास सुरुवात केली.
मध्यस्थी पडली महागात
कार्यक्रमात वाद होत असल्याचे पाहून फिर्यादी संतोष पांडुरंग चिनकटे (वय ४०) आणि इतर साक्षीदारांनी मध्यस्थी केली. त्यांनी आकाश याची समजूत काढली आणि त्याला बाजूला घेऊन गेले. मात्र, हा राग मनात धरून आकाश जगदाळे आणि चंद्रवदन सखाराम जगदाळे यांनी संतोष चिनकटे यांना आपल्या घरी नेले. “तू आम्हाला तिथे का समजावले आणि शांत का बसवले?” असा जाब विचारत दोघांनी चिनकटे यांना मारहाण सुरू केली.
हाताचे ठोसे लागून नाकाचे हाड फॅक्चर
आरोपींनी सुरुवातीला हाताच्या थापटाने मारहाण केली. त्यानंतर आकाश जगदाळे याने संतोष चिनकटे यांच्या नाकावर, तोंडावर आणि छातीवर जोरात ठोसे लगावले. या भीषण मारहाणीत चिनकटे यांच्या डाव्या नाकपुडीचे हाड फॅक्चर झाले असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
पोलीस कारवाई
या घटनेनंतर संतोष चिनकटे यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी १० मार्च २०२६ रोजी रात्री ८.४४ वाजता आरोपी १) आकाश चंद्रवदन जगदाळे आणि २) चंद्रवदन सखाराम जगदाळे यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ च्या कलम ११७(२) (जबर दुखापत), ११५(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा (रजि. नं. २०/२०२६) दाखल केला आहे.
गावपातळीवर परंपरेने चालणाऱ्या नमनाच्या कार्यक्रमात अशा प्रकारे हिंसक घटना घडल्याने कुटरे परिसरात नाराजी व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.














