गुहागरमध्ये राडा! पालशेत येथील बिअर बारमध्ये धक्का लागल्यावरून मासेमाराला बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

गुहागर (रत्नागिरी): रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातून मारहाणीची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पालशेत बाजारपेठेतील एका बिअर बारमध्ये केवळ धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून एका ५२ वर्षीय मासेमाराला दगड आणि लाकडी बांबूने बेदम मारहाण करण्यात आली आहे. या हल्यात मासेमार गंभीर जखमी झाला असून, गुहागर पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद गोपाळ पालशेतकर (वय ५२, रा. पालशेत जाईलवाडी) हे व्यवसायने मासेमार आहेत. मंगळवार, दिनांक १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास ते आणि त्यांचा भाचा आदेश नाटेकर हे पालशेत बाजारपेठेतील ‘हॉटेल गारवा बिअर बार’ येथे बसले होते.

यावेळी आरोपी क्र. १ प्रेमनाथ अंकुश पटेकर हा बारमध्ये आला आणि फिर्यादींना जोरात धक्का मारून बाहेर गेला. काही वेळातच तो परत आत आला आणि टेबलवर बसलेल्या प्रमोद पालशेतकर यांच्या शर्टाची कॉलर पकडली. “मी तुला जाणूनबुजून धक्का मारला, तुला काय करायचे आहे ते कर,” असे म्हणत त्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

बाहेर पडताच दगड आणि बांबूने हल्ला

वाद वाढू नये म्हणून फिर्यादी प्रमोद पालशेतकर बारमधून बाहेर पडले आणि आपल्या मोटारसायकलवर जाऊन बसले. मात्र, आरोपींचा राग शांत झाला नव्हता. आरोपी क्र. २ साहिल सीताराम पटेकर याने जमिनीवरचा मोठा दगड उचलून फिर्यादींच्या दिशेने फेकून मारला. हा दगड थेट त्यांच्या डोक्याला लागल्याने रक्ताची धार लागली.

त्याच वेळी, आरोपी क्र. १ प्रेमनाथ पटेकर याने हातातील लाकडी बांबूने प्रमोद यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि कमरेवर जोरदार प्रहार केले, ज्यामुळे ते मोटारसायकलवरून खाली पडले. ते खाली पडल्यानंतर, आरोपी क्र. १, २ आणि ३ (चिंतामणी गणू पटेकर) या तिघांनी मिळून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

महिलांनाही धक्काबुक्की

मारहाणीचा आवाज ऐकून प्रमोद पालशेतकर यांची बहीण आणि भावजय त्यांना सोडवण्यासाठी धावून आल्या. मात्र, उन्मत्त झालेल्या आरोपींनी त्यांनाही सोडले नाही. दोन्ही महिलांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली.

गुन्हा दाखल आणि तपास

या भीषण हल्ल्यात प्रमोद पालशेतकर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुहागर पोलिसांनी १० मार्च २०२६ रोजी रात्री ९.०० वाजता आरोपी प्रेमनाथ पटेकर, साहिल पटेकर आणि चिंतामणी पटेकर (सर्व रा. पालशेत) यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ च्या कलम ११८(१) (घातक शस्त्राने दुखापत), १२५ (अ) (जीवितास धोका निर्माण करणे), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १४/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

भरदिवसा बाजारपेठेतील बिअर बारमध्ये घडलेल्या या हिंसक घटनेमुळे पालशेत परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.