गॅस टंचाईवरून विधानसभा तापली! विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल; ३०% हॉटेल्स बंद, गॅस टंचाईमुळे काळाबाजार वाढल्याचा आरोप

मुंबई: आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचे पडसाद आता महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले आहेत. राज्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, सरकारने यावर तातडीने निवेदन करावे, अशी आक्रमक मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. गॅसअभावी सामान्य गृहिणींपासून ते हॉटेल व्यावसायिकांपर्यंत सर्वांचेच कंबरडे मोडले असल्याचे त्यांनी सभागृहात मांडले.

मुंबई-नागपूरमधील ३०% हॉटेल्सना टाळे!

राज्यातील गंभीर परिस्थितीचे चित्रण करताना वडेट्टीवार म्हणाले की, “काल विधानसभेचे कामकाज रात्री १ वाजेपर्यंत सुरू असताना कँटीन बंद होते. बाहेरील हॉटेल्सही गॅसअभावी बंद आहेत. एकट्या मुंबई आणि नागपूरमधील सुमारे ३० टक्के हॉटेल्स गॅस पुरवठा नसल्यामुळे बंद करण्यात आली आहेत.” याचा थेट परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि पर्यटनावर होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

गॅस सिलिंडरची गाडी चोरीला; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

टंचाईमुळे गॅसचा काळाबाजार वाढण्याची भीती वडेट्टीवारांनी व्यक्त केली. त्यांनी एका धक्कादायक घटनेचा उल्लेख केला की, HPC ची १८ लाख रुपयांच्या सिलिंडरची गाडी चोरीला गेली आहे. ही परिस्थिती कायदा व सुव्यवस्थेसाठी भयावह असून, टंचाईचा फायदा घेऊन लूट सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यभरात आंदोलनांचा वणवा

गॅस टंचाईच्या निषेधार्थ कोल्हापूर, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात आंदोलने सुरू झाली आहेत. “एकडे सरकार लाडक्या बहिणींच्या गप्पा मारत आहे, पण दुसरीकडे त्याच बहिणींना चूल कशी पेटवायची, याची चिंता सतावत आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.

प्रमुख मागण्या:

  • सरकारने सध्या राज्यात गॅसचा साठा किती उपलब्ध आहे, याची माहिती द्यावी.
  • पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे काय पाठपुरावा करत आहे, याचे निवेदन करावे.
  • गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत.

अध्यक्षांचे निर्देश

विजय वडेट्टीवार यांच्या मागणीवर विधानसभा अध्यक्षांनी निर्देश दिले की, जरी हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असला, तरी राज्य सरकारने जनतेच्या हितासाठी सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि परिस्थिती हाताळावी.


बातमीचे महत्त्वाचे मुद्दे:

  • हॉटेल उद्योग संकट: मुंबई-नागपूरमधील अनेक हॉटेल्स गॅसअभावी बंद.
  • सुरक्षा यंत्रणा फेल: १८ लाखांचे गॅस सिलिंडर चोरीला गेल्याचा वडेट्टीवारांचा दावा.
  • जनतेत असंतोष: कोल्हापूर आणि विदर्भात तीव्र निदर्शने.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:23 11-03-2026