मारुती मंदिर परिसरात पार्किंगला ‘नो एन्ट्री’, मग भेळवाल्याला ‘ग्रिन सिग्नल’ कुणाचा?

रत्नागिरी: शहराचे हृदय मानल्या जाणाऱ्या मारुती मंदिर सर्कल परिसरातील सुशोभीकरणाचा प्रश्न सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एकीकडे गार्डन विकसित करण्यासाठी सामान्य नागरिकांचे पार्किंग बंद करण्यात आले असताना, त्याच जागेवर एका परप्रांतीय भेळवाल्याने आपला तळ ठोकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नेमका प्रकार काय?
गेल्या महिनाभरापासून मारुती मंदिर येथील पार्किंगची जागा गार्डन विकसित करण्याच्या नावाखाली बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी दुचाकी लावण्यास कडक मनाई करण्यात आली असून, सर्वसामान्य वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, ज्या जागेवर सर्वसामान्यांना मज्जाव आहे, तिथेच एक परप्रांतीय भेळवाला बिनधास्त आपली गाडी लावून व्यवसाय करत आहे.

सत्ताधाऱ्यांच्या नावाचा वापर?
जेव्हा या भेळवाल्याला “या मोक्याच्या जागेवर व्यवसाय करण्याची परवानगी कोणी दिली?” असा जाब विचारण्यात आला, तेव्हा त्याने थेट बांधकाम सभापती बंटी कीर यांचे नाव पुढे केले. “मला बंटी कीर यांनीच येथे गाडी लावण्यास सांगितले आहे,” असा दावा या भेळवाल्याने केला.
“मी अशी कोणतीही परवानगी दिलेली नाही.”
— या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना बंटी कीर यांनी भेळवाल्याचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

वाहतूक पोलिसांचा ‘दुजाभाव’ चर्चेत
एकीकडे पार्किंगच्या जागेत भेळवाल्याचे अतिक्रमण सुरू असताना, दुसरीकडे वाहतूक पोलीस मात्र रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहेत. हातात ई-चलन मशीन घेऊन पोलीस वाहनधारकांना अडवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. “भेळवाल्याच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष आणि सामान्यांवर तत्परतेने कारवाई, हा कसला न्याय?” असा संतप्त सवाल रत्नागिरीकर विचारत आहेत.

प्रशासकीय कारवाई होणार का?
सुशोभीकरणाच्या नावाखाली पार्किंग हिरावून घेतल्यानंतर आता तिथे अनधिकृत व्यवसायांना खतपाणी घातले जात आहे का? याकडे नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन लक्ष देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.