रत्नागिरी : गेली १७ वर्षे सामाजिक कार्यकर्त्या प्राचीताई शिंदे या रत्नागिरी जिल्ह्यात महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सातत्याने कार्य करत असून त्यांच्या या उपक्रमाला राष्ट्रमाता जिजाऊ संस्थेचे सहकार्य असल्याची माहिती जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी दिली. तुम्ही सांगाल त्या गावात किंवा वाडीत स्वयंरोजगार केंद्र सुरू करू तसेच उद्योगिनींना मुंबई व ठाणे येथे बाजारपेठ उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. रत्नागिरी ग्राहक पेठच्या प्रदर्शनाला जयेश मंगल कार्यालयात भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
जिजाऊ संस्था महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. अगरबत्ती, साबण निर्मितीपासून ते मोफत शिवणकला प्रशिक्षणापर्यंत विविध उपक्रमांद्वारे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे पती आणि मुलांच्या जबाबदाऱ्यांसोबत महिलाही उत्पन्नाचे साधन निर्माण करून कुटुंबाला हातभार लावत आहेत. कोकणातील गरीब विद्यार्थ्यांसाठी पाचही जिल्ह्यांत सीबीएसई शाळा उभारण्याचे उद्दिष्ट संस्थेने ठेवले आहे. तसेच आयएएस, आयपीएस अधिकारी घडावेत यासाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, संगणक प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. दरवर्षी किमान दहा विद्यार्थी स्पर्धा परीक्षांत अव्वल यावेत, असे ध्येय संस्थेने ठेवले असून कोकण समृद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही नीलेश सांबरे यांनी सांगितले.
या वेळी नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे प्रमुख उपस्थित होत्या. त्यांनी सांगितले की, ग्राहक पेठच्या माध्यमातून प्राचीताई शिंदे महिलांना उद्योजकतेसाठी प्रेरणा देत असून महिलांसाठी उपयुक्त उपक्रम राबवत आहेत. उद्योग करताना प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात; मात्र त्यापलीकडे जाऊन भारतीय संस्कृती जपणारे पारंपरिक खाद्यपदार्थ, वेशभूषा आणि पेहराव नव्या पद्धतीने पुढे आणण्यासाठी महिला उद्योजिकांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनीही प्राची शिंदे यांनी बचत गट व महिला उद्योगिनींसाठी अनेक वर्षे घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात व्यासपीठावर जिजाऊ संस्थेचे केदार चव्हाण हेदेखील उपस्थित होते. त्यांनी जिजाऊ संस्थेच्या मोफत रुग्णालयासंबंधी माहिती दिली. मान्यवरांचा सत्कार प्राची शिंदे यांनी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 12-03-2026













