रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी येथील ‘ओंकार ज्वेलर्स’ या दुकानात झालेल्या घरफोडीच्या प्रयत्नाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. मुंबईतील घाटकोपर आणि कुर्ला परिसरातून चार सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि इतर साहित्यासह सुमारे ११.९५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय होती?
१८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे १:३१ च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी श्रृंगारतळी बाजारपेठेतील ओंकार ज्वेलर्सचे बाहेरील शटर तोडून आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी आतील शटरही तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक कारणांमुळे त्यांना चोरी करण्यात यश आले नाही. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एलसीबीची कौतुकास्पद कामगिरी
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिला होता. एलसीबीच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासाचे धागेदोरे थेट मुंबईपर्यंत पोहोचले.
मुंबईतून चौघांना घेतलं ताब्यात
एलसीबीच्या पथकाने मुंबईत सापळा रचून खालील चार आरोपींना अटक केली: १) निशांत सुधीर आंबोकर (घाटकोपर, मुंबई) २) मोईन शकील शेख (घाटकोपर, मुंबई) ३) सुमित कुलदीप चुनियाना (कुर्ला, मुंबई) ४) आयुष जितेंद्र घागडा (घाटकोपर, मुंबई)
या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले एक चारचाकी वाहन आणि इतर साहित्य असा एकूण ११ लाख ९५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस पथकाचा सन्मान
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात स.पो.उनि. संदीप ओगले, पोलीस हवालदार विजय आंबेकर, गणेश सावंत, दिपराज पाटील, योगेश नार्वेकर आणि चालक पोलीस शिपाई अतुल कांबळे यांचा समावेश होता.
जिल्ह्यातील चोरी आणि घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी पोलीस सतर्क असून, अशा प्रकारच्या कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.














