रत्नागिरी: रत्नागिरी शहरात सध्या गॅस सिलिंडरच्या तुटवड्याची अफवा आणि बुकिंगला होणारा विलंब यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शहरातील प्रसिद्ध ‘शांतादुर्गा गॅस एजन्सी’च्या बाहेर आज ग्राहकांनी सिलिंडर बुकिंगसाठी मोठी गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये आणि सुरक्षेच्या कारणास्तव गॅस एजन्सीबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
२५ दिवसांचे बुकिंग आता ४५ दिवसांवर
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वी घरगुती गॅस सिलिंडरचे बुकिंग केल्यानंतर साधारणपणे २५ दिवसांच्या अंतराने दुसरे सिलिंडर मिळत होते. मात्र, आता हा कालावधी थेट ४५ दिवसांवर गेल्याने ग्राहकांमध्ये ‘पॅनिक’ (भीतीचे) वातावरण निर्माण झाले आहे. पुढचे सिलिंडर वेळेवर मिळेल की नाही, या शंकेने नागरिक मोठ्या संख्येने एजन्सीवर धाव घेत आहेत.
पोलीस बंदोबस्त तैनात
एजन्सीच्या बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, वादावादीचे प्रसंग टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी स्थानिक प्रशासनाने पोलीस बंदोबस्त दिला आहे. पोलीस कर्मचारी रांगा लावणे आणि शांतता राखण्याचे काम करत आहेत.
प्रशासनाचे आवाहन: घरगुती साठा पुरेसा
जगभरात सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने ‘व्यावसायिक’ (Commercial) सिलिंडरच्या वितरणावर काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत. मात्र, घरगुती गॅसचा (Domestic LPG) पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून वारंवार स्पष्ट करण्यात येत आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
घरगुती सिलिंडरचा तुटवडा होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत असल्यामुळे नागरिक घाबरून बुकिंगसाठी गर्दी करत आहेत. व्यावसायिक गॅसच्या वितरणात बदल झाले असले, तरी सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती गॅस पुरवठ्यावर सध्या कोणताही मोठा परिणाम झालेला नाही. नागरिकांनी संयम राखावा आणि अफवांना बळी पडू नये, असे आवाहन गॅस एजन्सी आणि प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.











