रत्नागिरी | विशेष प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरसाठी होणारी धावपळ आता थांबली असून रत्नागिरी शहरात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत झाला आहे. पुरवठा मुबलक असल्याने गॅस एजन्सीबाहेरील गर्दी आता पूर्णपणे ओसरली असून नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
शांतादुर्गा गॅस एजन्सीबाहेर शुकशुकाट
शहरातील प्रमुख वितरक असलेल्या ‘शांतादुर्गा गॅस एजन्सी’बाहेर काही दिवसांपूर्वी सिलिंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत होत्या. मात्र, आज सकाळपासूनच याठिकाणी गर्दी नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रशासनाकडून गॅसचा साठा पुरेसा उपलब्ध करून देण्यात आल्याने वितरण व्यवस्था पुन्हा एकदा पूर्वपदावर आली आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका: प्रशासनाचे आवाहन
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरात गॅस सिलिंडरचा मुबलक साठा उपलब्ध आहे. पुरवठ्याबाबत कोणत्याही तांत्रिक अडचणी नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून विनाकारण साठवणूक करण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
४५ दिवसांची अट लवकरच शिथिल होणार?
सध्या एका सिलिंडरची डिलिव्हरी मिळाल्यानंतर दुसरा सिलिंडर मिळण्यासाठी ४५ दिवसांची मुदत (Waiting Period) अनिवार्य आहे. मात्र, पुरवठा ज्या पद्धतीने वाढत आहे, ते पाहता ही दिवसांची अट लवकरच कमी करण्यात येईल, असे संकेतही देण्यात आले आहेत. यामुळे ग्राहकांना आता अधिक वेगाने गॅस रिफिल उपलब्ध होऊ शकणार आहे.













