नवी मुंबई | विशेष प्रतिनिधी कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या २३ व्या बैठकीत रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मे महिन्यापासून रत्नागिरी स्थानकावरून धावणाऱ्या प्रमुख गाड्यांच्या कोट्यात २५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली असून, यामुळे खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरीतील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
गाड्यांचा कोटा वाढला: मे महिन्यापासून ‘अच्छे दिन’
समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी रत्नागिरी स्थानकासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. ५ मार्च रोजी पीआरएस (PRS) टर्मिनलवर आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून मे महिन्यापासून खालील बदल लागू होतील:
कोकणकन्या व मांडवी एक्सप्रेस: २AC, ३AC आणि ३E क्लासमध्ये ५०% वाढ, तर स्लीपर क्लासच्या कोट्यात २५% वाढ करण्यात आली आहे.
जनशताब्दी व वंदे भारत: जनशताब्दीच्या चेअर कार आणि सेकंड सिटिंग, तसेच वंदे भारतच्या चेअर कार कोट्यातही वाढ करण्यात आली आहे. हा अतिरिक्त कोटा मडगाव येथून रत्नागिरीकडे वर्ग करण्यात आला आहे.
ट्रेनच्या लेट लतीफीवर प्रशासनाचे स्पष्टीकरण
बैठकीत सचिन वहाळकर यांनी विस्कळीत झालेल्या रेल्वे वेळापत्रकाचा, विशेषतः तेजस एक्सप्रेसच्या लेट लतीफीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. यावर प्रशासनाने वस्तुस्थिती मान्य करत सांगितले की, मार्गावरील मेंटेनन्सची कामे, वाढलेली गाड्यांची संख्या आणि मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे विलंब होत आहे. येत्या महिनाभरात ही कामे पूर्ण होऊन गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत होईल, असे आश्वासन कोकण रेल्वेचे सीएमडी संतोषकुमार झा यांनी दिले.
दिवा-रत्नागिरी गाडी लवकर सुटणार?
रत्नागिरी-दिवा गाडी पुन्हा दादरपर्यंत नेण्याबाबत मध्य रेल्वेकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, तो निर्णय होईपर्यंत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही गाडी दिव्यावरून लवकर सोडण्याची मागणी करण्यात आली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, येत्या ८ दिवसांत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.
रत्नागिरी स्थानकावर सुविधांचे ‘शेड’
रत्नागिरी स्थानकावरील दुचाकी पार्किंगमध्ये शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत होते. ही बाब लक्षात घेता, संतोषकुमार झा यांनी तात्काळ आर्थिक तरतूद करून पार्किंगवर शेड उभारण्याचे आणि पार्किंग पट्टे व फलक लावण्याचे निर्देश चीफ इंजिनियरना दिले आहेत.
इतर महत्त्वाचे निर्णय:
खेड थांबा: वांद्रे टर्मिनस ते मडगाव ट्रेनला खेड येथे थांबा देण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येणार आहे.
कोल्हापूर-वैभववाडी मार्ग: हा मार्ग भारतीय रेल्वे करणार असली, तरी हे काम करण्यास कोकण रेल्वे उत्सुक असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
या बैठकीला आमदार संजय केळकर, खासदार अनुप धोत्रे, वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव आणि कोकण रेल्वेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स उपस्थित होते. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात कोटा वाढल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.












