रत्नागिरी : मलपी नौकांचा वावर तूर्तास कमी..

रत्नागिरी : बांगडा मासा कमी मिळत असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनारी परराज्यातील मलपी नौकांचा वावर कमी झाला आहे. या नौकांनी सिंधुदुर्ग किनारपट्टीकडे लक्ष वळविल्यामुळे यंदा रत्नागिरीतील मच्छीमार सुखावलेले आहेत. खोल समुद्रातील वातावरण पूरक नसल्यामुळे अपेक्षित मासळी मच्छीमारांच्या जाळ्यात लागत नाही.

बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात गेले काही दिवस कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मच्छीमारीवर निर्बध आले होते. मिरकरवाडासह हर्णे या मोठ्या बंदरांमधील अनेक नौका बंदरातच उभ्या होत्या. गेल्या चार दिवसात वातावरण निवळू लागल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परराज्यातील नौकांची वक्रदृष्टी कोकण किनारपट्टीवर पडू लागली आहे. गेल्या काही दिवसात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मलपी नौकांचा मोठ्याप्रमाणात वावर सुरु आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मत्स्य विभागाचा तारांबळ उडत आहे. तरीही कारवाई सुरू आहे.

तुलनेत सध्या मलपी नौकांच्या अतिक्रमणापासून रत्नागिरीतील किनारा सुरक्षित आहे. मागील महिन्यात गुहागरसह आजुबाजुच्या परिसरात रात्रीच्यावेळी मलपी नौकांनी किनारी भागात मोठ्याप्रमाणात मासेमारी केली होती. ही बाब स्थानिक मच्छीमारांनी मस्त्य विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर मत्स्य विभागाने गस्त सुरू केली. परिणामी मलपींचा वावर कमी झाला. दिवाळीच्या कालावधीत दरवर्षी मलपी नौकांचा मोठ्याप्रमाणात त्रास होतो. यंदा मात्र तशी परिस्थिती उद्भवलेली नाही, त्यामुळे यंदा स्थानिक मच्छीमारांना दिलासा मिळालेला आहे. दिवाळीच्या कालावधीत बांगडा, म्हाकुळ हे मोठ्याप्रमाणात रत्नागिरी किनारी भागात मिळतात. यंदा ही मासळी कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे मलपी नौकांनी आपले लक्ष्य सिंधुदुर्ग किनाऱ्याकडे वळविलेले आहे.

परराज्यातील मच्छीमारी नौकांचा वावर कमी आहे. त्यांना अपेक्षित मासळी या किनाऱ्यावर मिळत नाही. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गस्त सुरू आहे. गेल्या काही दिवसांत परजिल्ह्यातील अनधिकृत मासेमारी करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच नवीन नौकांची कागदपत्र पडताळणी बंदरात जाऊन केली जाते. – आनंद पालव, प्रभारी, सहायक मत्स्य आयुक्त

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 31/Oct/2024