रत्नागिरी : शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे, रस्त्यालगत पडलेले खडी आणि वाळूचे ढिगारे आणि सुसाट वाहनचालकांमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी ज्येष्ठ नागरिकांचे नाहक बळी जात आहेत.
या पार्श्वभूमीवर येथील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जिल्हाधिकारी व पालिकेला निवेदन दिले आहे.
मारूती मंदिर येथे २६ ऑक्टोबर रोजी दत्तप्रसाद वासुदेव गोडसे या वयोवृद्ध नागरिकाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला होता. माळनाका परिसरात रस्त्याचे काम झाल्यानंतर टाकून ठेवलेल्या खडीवरून दुचाकी घसरली आणि तिथे असलेल्या व्यक्तीला धडक बसली. यामध्ये त्या ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. रत्नागिरी शहरात सध्या काँक्रिटीकरणाची कामे सुरु आहेत. काँक्रिटीकरण झालेल्या ठिकाणच्या बाजू पट्ट्या व्यवस्थित करण्यात आलेल्या नाहीत तिथे खडी पसरुन ठेवलेली आहे. त्यामुळे दूचाकी घसरण्याचे प्रकार घडतात.
माळनाका अपघातानंतर मंगळवारी (ता. २९) ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि नगरपालिकेला निवेदन देऊन शहरातील वाढत्या रस्ते अपघाताबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पालिकेच्या महसूल विभाग आरटीओ कार्यालय आणि पोलिसखात्याने रस्ते अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ अंमलात आणाव्यात, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांच्या शिष्टमंडळाने केली आहे.
रस्त्यावर पडलेले खड्डे आणि रस्त्यालगत साठवलेले वाळू आणि खडीचे ढीग यामुळे वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. सुसाट वेगाने वाहने चालवणाऱ्या वाहनचालकावर पोलिस वाहतूक विभाग आणि आरटीओ कार्यालयाने कायदेशीर कारवाई करून अपघात नियंत्रण उपायोजना अमलात आणण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हास्तरावर रस्ते सुरक्षा समिती शासनाने स्थापित केली आहे. या समितीने याचा गंभीरपणे विचार करावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सुरेश विष्णू उर्फ अण्णा लिमये आणि समाजभूषण सुरेंद्र घुडे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिकांच्या शिष्टमंडळाने केली आहे. या शिष्टमंडळात दिलीपकुमार साळवी, शरद विलणकर, दत्ताराम लिंगायत, अरविंद वांदरकर, अनिल सुर्वे, अपर्णा कोचरेकर, स्नेहल कुंभवडेकर इत्यादी ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.
महामार्ग विभागाला सूचना देण्याची गरज
टीआरपी येथे झालेल्या अघाताला दुचाकी घसरल्याचे कारण आहे. सध्या मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी फलकही लावलेले नाहीत. अशाठिकाणी काम सुरु असल्याच्या सूचना दिलेल्या नाहीत. जेणेकरुन वाहनचालकांना व्यवस्थित वाहने चालविता येतील. त्यासाठी योग्य त्या सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देणे आवश्यक आहेत.
शहरामध्ये कॉंक्रिटिकरणाची काम सुरू आहेत. त्यांच्या साईडपट्ट्या मारायच्या राहिल्या आहेत. दक्षता म्हणून आम्ही पुर्ण झालेल्या रस्त्याच्या साईडपट्ट्या मारायला घेतल्या आहेत. साळवी स्टॉपपासून कामाला सुरवात झाली आहे. त्यामुळे रस्ते रुंद होऊन भविष्यात अपघात होणार नाही याची खबरदारी घेतली आहे.
– तुषार बाबर, पालिका मुख्याधिकारी, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 31-10-2024














