रत्नागिरी: रत्नागिरी शहराच्या रस्त्यांवर आज एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. हातात भगवा ध्वज, अंगात मावळ्याचा पेहराव आणि घोड्यावर स्वार होऊन एक तरुण ‘शिवराज भूषण’ या महानाट्याची दवंडी देताना दिसला. निमित्त आहे, श्री शिवराज मंच, मालवण आयोजित ‘शिवराज भूषण’ या महानाट्याचे, जे येत्या २२ मार्च रोजी रत्नागिरीत रंगणार आहे.
कवी भूषणांच्या काव्यातून उलगडणार शिवरायांचा प्रताप
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव प्रत्येक मराठी माणसाच्या श्वासात आहे. मात्र, महाराजांची हिंदवी स्वराज्याची पताका आणि त्यांचा वैभवशाली पराक्रम उत्तर भारतात पोहोचवण्याचे महान कार्य थोर कवी भूषण यांनी केले. त्यांच्या याच अजोड आणि विररसाने ओतप्रोत भरलेल्या काव्यावर आधारित ‘शिवराज भूषण’ हे महानाट्य आता रत्नागिरीकरांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.
मालवणच्या ६० शिवप्रेमी कलाकारांचा अविष्कार
या महानाट्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात मालवणमधील ६० हून अधिक शिवप्रेमी कलाकारांनी सहभाग घेतला आहे. स्थानिक कलाकारांनी अत्यंत मेहनतीने ही नाट्यकृती साकारली असून, शिवरायांचा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे.
तरुणाईला मिळणार प्रेरणेची शिदोरी
आजच्या धावपळीच्या युगात तरुणांना अपयशावर मात करून नवा इतिहास घडवण्यासाठी शिवचरित्र आणि कवी भूषणांचे काव्य अत्यंत प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. हे महानाट्य केवळ मनोरंजन नसून तो एक संस्कार आहे, जो पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील.
कार्यक्रमाचा तपशील:
- दिनांक: २२ मार्च २०२६
- वेळ: सायंकाळी ७:०० वाजता
- स्थळ: स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी
रत्नागिरीकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन
यशवंत आणि कीर्तिवंत होण्याचा संकल्प घेऊन विद्यार्थ्यांनी आणि रत्नागिरीतील समस्त नागरिकांनी या महानाट्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवराज मंच, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे. शहरात घोड्यावर स्वार होऊन केलेली ही आगळीवेगळी जाहिरात सध्या संपूर्ण रत्नागिरीत चर्चेचा विषय ठरत असून, या प्रयोगाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.














