शतकोत्सवी वर्षात विजयदुर्गच्या श्रीराम मंदिराचा जिर्णोद्धार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग येथील श्रीराम मंदिराला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्णमयी क्षणाचे औचित्य साधून ग्रामस्थांनी मंदिराच्या जिर्णोद्धाराचा संकल्प केला आहे. चैत्र शुक्ल नवमी शके १८४८ म्हणजेच २१ एप्रिल १९२६ रोजी या मंदिराची स्थापना करण्यात आली होती.
कै. आवडाबाई भिवा टिकम यांच्या स्मरणार्थ त्यांची बहीण कै. गंगाबाई तुकाराम बानकर यांनी हे मंदिर बांधून एका ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक व्यवस्थापनाकडे सुपूर्द केले होते. आता १०० वर्षांनंतर या मंदिराला पुन्हा नवे रूप प्राप्त होत असून, या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक उत्सुक आहेत.
रत्नागिरीत ओसवाल यांच्या निवासस्थानी मूर्तींचे आगमन
या जिर्णोद्धार सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, मंदिरात स्थापित होणाऱ्या प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या भव्य प्रतिमा सध्या रत्नागिरीत विराजमान झाल्या आहेत. रत्नागिरीतील प्रसिद्ध भाविक कै. किरणशेठ वस्तीमल ओसवाल यांचे विजयदुर्गशी असलेले जुने ऋणानुबंध आणि श्रद्धा यामुळे त्यांनी मंदिर देवता, गणेश स्थापना आणि प्राणप्रतिष्ठापना या कार्यात गावकऱ्यांना मोलाचे सहकार्य केले आहे.
गावकऱ्यांच्या संमतीने या नूतन मूर्ती सध्या रत्नागिरी येथील ओसवाल यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. रत्नागिरीतील भाविकांना या मूर्तींचे दर्शन घेण्याची ही एक दुर्मिळ संधी प्राप्त झाली आहे.
चैत्र शुक्ल नवमीला होणार प्राणप्रतिष्ठापना
या मूर्ती रत्नागिरीहून विजयदुर्गला नेण्यात येतील आणि येत्या चैत्र शुक्ल नवमीच्या शुभ मुहूर्तावर नूतन मंदिरात त्यांची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. शंभर वर्षांपूर्वी ज्या तिथीला मंदिराची स्थापना झाली होती, त्याच तिथीला हा जिर्णोद्धार सोहळा पार पडणार असल्याने याला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
भाविकांना दर्शनाचे आवाहन
“आमचे वडील कै. किरणशेठ ओसवाल यांची या मंदिरावर नितांत श्रद्धा होती. त्यांच्या इच्छेनुसार आणि गावकऱ्यांच्या प्रेमापोटी आम्हाला या सेवेची संधी मिळाली आहे. रत्नागिरीतील सर्व भाविकांनी आमच्या निवासस्थानी येऊन या मनमोहक मूर्तींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा,” असे आवाहन किरणशेठ यांचे सुपुत्र आणि ‘संतोष फर्निशिंग’ व ‘अंतरंग’ चे मालक अभय ओसवाल यांनी केले आहे.












