Rajapur: रस्ता अडवून मासे विक्री करणाऱ्या १३ महिलांवर गुन्हे दाखल

राजापूर: शहरातील मुख्य बाजारपेठ आणि शिवाजीपथ परिसरात सार्वजनिक रस्ता अडवून, अस्वच्छता पसरवत बेकायदेशीररीत्या मासे विक्री करणाऱ्या १३ महिला विक्रेत्यांविरुद्ध राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नगर परिषदेच्या सूचनांकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने अखेर प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे.

नेमकी घटना काय?

राजापूर नगर परिषद हद्दीतील शिवाजीपथ ते मुख्य बाजारपेठ या वर्दळीच्या रस्त्यावर काही महिला मासे विक्रीसाठी बसत होत्या. यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले होते आणि स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायातही अडथळा निर्माण होत होता. या तक्रारींची दखल घेत शुक्रवारी (१३ मार्च २०२६) सकाळी नगर परिषदेचे स्वच्छता पथक कारवाईसाठी उतरले.

स्वच्छता निरीक्षक अमित पोवार, स्वच्छता मुकादम राजन जाधव आणि त्यांच्या पथकाने महिलांना अधिकृत ‘मच्छी मार्केट’मध्ये जाऊन बसण्याची विनंती केली. मात्र, संबंधित महिलांनी या सूचनांना केराची टोपली दाखवत रस्त्यावरच विक्री सुरू ठेवली.

दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा प्रश्न

रस्त्यावरच मासे साफ केल्यामुळे पडणारी खवले आणि सांडलेल्या घाण पाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. वारंवार सांगूनही प्रशासकीय आदेशाचे उल्लंघन होत असल्याने नगर परिषदेने कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला.

या महिलांविरुद्ध झाला गुन्हा दाखल

नगर परिषदेचे स्वच्छता मुकादम राजन रामचंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजापूर पोलिसांनी खालील १३ महिलांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:

  • सुमया बोरकर, नाजिया वाडकर, निलोफर होडेकर, आक्सा समीर सोलकर, मिनाज भाटकर, रुक्शाना बोरकर, अनिसा सोलकर, आक्सा पावसकर, नाजिया नुरुद्दीन मंचेकर, मुमताज तौफीक पिरकर, शबाना सलीम काझी, मुमताज सलीम फडणीस आणि नसरिन सोलकर.

कायदेशीर कलमे: ही कारवाई महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ चे कलम २६७, २६९ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११५ नुसार करण्यात आली आहे.

अतिक्रमण करणाऱ्यांना प्रशासनाचा इशारा

या कारवाईमुळे राजापूर शहरातील अनधिकृत विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करून रस्ता अडवणाऱ्या आणि अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा स्पष्ट इशारा नगर परिषद प्रशासनाने दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 16-03-2026