मंडणगड पोलिसांची ‘फिल्मी’ स्टाईल कामगिरी! २,५०० किमीचा थरारक पाठलाग करून दागिने चोरणाऱ्या भामट्याला ठोकल्या बेड्या

मंडणगड: महिला बचत गटाच्या विश्वासाला तडा देऊन लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या चंद्रकांत तेरवणकर (रा. आंबेळे, चिपळूण) याच्या मुसक्या आवळण्यात मंडणगड पोलिसांना यश आले आहे. सुमारे अडीच हजार किलोमीटरचा प्रवास आणि पाच दिवसांचे अहोरात्र शोधकार्य राबवून पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

मंडणगड तालुक्यातील दाभट परिसरात महिला बचत गटासाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेत चंद्रकांत तेरवणकर कार्यरत होता. ९ मार्च रोजी त्याने संस्थेतील सहकारी महिलांचा विश्वास संपादन करून समिधा येरवणकर, साक्षी सोंडकर, जागृती तांबुटकर, तेजस्वी सुतार, सानिका गायकवाड आणि सायली यादव या सहा महिलांनी जपून ठेवण्यास दिलेले २ लाख ७१ हजार १०० रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता.

अडीच हजार किलोमीटरचा थरारक पाठलाग

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडणगड पोलिसांचे पथक तातडीने रवाना झाले. आरोपी चंद्रकांत हा अत्यंत सराईत असल्याने तो वारंवार आपले सिम कार्ड आणि ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या तीन दिवसांत पुणे, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर आणि धुळे यांसारखी शहरे पिंजून काढली.

अखेर पुण्याच्या ग्रामीण भागात लपून बसलेल्या चंद्रकांतला पोलिसांनी सापळा रचून नाट्यमयरीत्या ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

बेपत्ता युवतीची सुखरूप सुटका

या कारवाईत पोलिसांनी केवळ चोरालाच पकडले नाही, तर चंद्रकांतने आपल्यासोबत जबरदस्तीने बंदिस्त करून ठेवलेल्या एका युवतीचीही सुखरूप सुटका केली आहे. या युवतीला पोलिसांनी सुरक्षितपणे परत आणले असून, या कामगिरीमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तपासात तांत्रिक कौशल्याचा वापर

आरोपी पोलिसांना चकवा देण्यासाठी सतत लोकेशन बदलत होता, मात्र पोलिसांनी आपले स्त्रोत आणि तांत्रिक ट्रेसींगच्या मदतीने अतिशय थरारक पद्धतीने ही मोहीम फत्ते केली.

पोलिस दलाचे यश: अवघ्या ५ दिवसांत परराज्याच्या सीमेपर्यंत धाव घेत आरोपीला जेरबंद केल्यामुळे मंडणगड पोलिसांच्या कार्यतत्परतेवर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 16-03-2026