रत्नागिरी : सागरी जैवविविधतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री ऑफ सोसायटी आणि कोकण कांदळवन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी सस्तन प्राणी, पक्षी यांच्या नोंदी आणि अभ्यासासाठी ‘जलचर’ हे मोबाइल अॅप तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून सागरी जलचरांचे संवर्धन करण्यासही मदत होणार आहे.
जलचर हे अॅप मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये वापरता येणार असून, सागरी, पशू-पक्ष्यांच्या नोंदी त्यात करायच्या आहेत. स्थानिक मच्छीमार, संशोधक, तटरक्षक दल, नौदल कर्मचारी हे या अॅपवर प्राणी, पक्ष्यांची माहिती नोंदवू शकतील. तसेच त्यांना नोंदवलेल्या जलचरांची माहिती मिळू शकेल. महाराष्ट्रातील किनारपट्टी लगतच्या सागरी अधिवासात आढळणाऱ्या समुद्री प्राण्यांची संपूर्ण माहिती या अॅपच्या माध्यमातून संकलित करून त्याद्वारे सागरी जलचरांचे संवर्धन करण्याचा उद्देश आहे.
दरम्यान, जीपीएस प्रणालीचा वापर करुन प्राणी, पक्ष्यांची छायाचित्रेही अपलोड करता येणार आहेत. एखादा सागरी जलचर किनारपट्टीवर येणार असेल (स्ट्रेंडिंग) तर त्याची पूर्वसूचना या प्रणालीच्या माध्यमातून वन विभागाला मिळू शकेल. हंगामी जलचरांबाबत अधिक तपशीलात नोंदीचे संकलन करता येऊ शकेल. त्यामुळे जलचरांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करणे शक्य होणार आहे. तसेच तातडीची मदत हवी असल्यास तशी नोंद करण्याचीही तरतूदही या प्रणालीत आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपाय करण्यासाठी संबंधित यंत्रणांची मदत मिळू शकेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 31/Oct/2024














