Breaking : रत्नागिरी गॅस एजन्सीचा वाद पेटला! कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; ५ सिलिंडरवरून मॅनेजमेंट विरुद्ध कामगार आमनेसामने

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील व्यावसायिक गॅस सिलिंडर वितरणावरून सुरू झालेला वाद आता विकोपाला गेला आहे. रत्नागिरी गॅस एजन्सीच्या व्यवस्थापनाने गोडाऊन कीपर आणि कर्मचाऱ्यांवर अवैध विक्रीचा आरोप केल्यानंतर, आज सकाळी ८:३० वाजल्यापासून सर्व १४ कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. हे सर्व कर्मचारी सध्या शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर जमले असून, वातावरण चांगलेच तापले आहे.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सध्याची परिस्थिती पाहून सर्व १४ कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ आंदोलन मागे घेतले आहे. तसेच एजन्सी कडून देखील या वादावर आता पडदा पडला आहे. त्यामुळे आता सार्वजन पोलीस स्थानकातून परतले आहेत.


आंदोलनाचे मुख्य कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरण करताना ५ सिलिंडर चुकीच्या पद्धतीने विकले गेल्याचा आरोप कंपनी मॅनेजमेंटने केला आहे. या प्रकरणी व्यवस्थापनाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार धाडली होती. या कारवाईच्या निषेधार्थ आणि आरोपांच्या चौकशीसाठी संतप्त कर्मचाऱ्यांनी आज कामावर न जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे गॅस वितरणावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कर्मचाऱ्यांचा दावा: “आम्ही नियमानुसारच वागलो”

या वादात कर्मचाऱ्यांनी आपली बाजू स्पष्ट करताना सांगितले की, “आम्ही व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरण अधिकृत पावती फाडूनच केले आहे. यात कोणतीही अवैध विक्री झालेली नाही.” कर्मचाऱ्यांनी मॅनेजमेंटचे आरोप फेटाळून लावले असून, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.

पोलीस ठाण्यात खडाजंगी आणि चर्चा

सकाळी ८:३० पासून सुरू झालेल्या या आंदोलनानंतर सर्व १४ कर्मचारी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर जमा झाले आहेत. सध्या पोलीस ठाण्यामध्ये गॅस एजन्सीचे मॅनेजमेंट आणि कर्मचारी यांच्यात पोलिसांच्या उपस्थितीत चर्चा सुरू आहे.

  • मॅनेजमेंटचा आरोप: गोडाऊन कीपरने ५ सिलिंडरची अवैध विक्री केली.
  • कामगारांचा आरोप: आम्ही दिलेल्या सूचनांचे पालन केले, मग कारवाई का?

जिल्हा प्रशासनाचे लक्ष

व्यावसायिक सिलिंडरच्या विक्रीवर सध्या काही मर्यादा असताना हा प्रकार घडल्याने जिल्हा पुरवठा विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. एजन्सीच्या अंतर्गत वादाचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना आणि अत्यावश्यक सेवांना बसू नये, यासाठी पोलीस सामोपचाराने मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.