Rajapur Crime: फेसबुकवरील मैत्री नडली! राजापुरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग; तिघांना बेड्या

राजापूर: सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेऊन एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची आणि अश्लील व्हिडिओद्वारे तिला ब्लॅकमेल केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजापूर आणि वैभववाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन नराधमांना अटक केली आहे.

ओळखीचे रूपांतर अत्याचारात

या प्रकरणातील मुख्य संशयित ओंकार सुर्वे (रा. वैभववाडी) याची जुलै २०२५ मध्ये पीडित तरुणीशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत ओंकार आणि त्याचा चुलत भाऊ मयूर सुर्वे यांनी पीडितेला ‘नापणे धबधबा’ दाखवण्याच्या बहाण्याने नेले. तिथे वेळ झाल्याचे सांगून तिला मयूरच्या जुन्या घरी नेण्यात आले आणि त्या दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे, या कृत्यादरम्यान त्यांनी पीडितेचे अश्लील व्हिडिओही रेकॉर्ड केले.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

अत्याचाराच्या घटनेनंतर काही महिन्यांनी, १४ मार्च रोजी पंकज पवार (रा. ताम्हाणे) याने हे अश्लील व्हिडिओ पीडितेला पाठवले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या सततच्या मानसिक त्रासामुळे पीडित तरुणी खचून गेली होती.

बहिणीच्या आधारामुळे फुटला वाचा

मानसिक दडपणाखाली असलेल्या पीडितेने आत्महत्येचा विचार आपल्या बहिणीकडे बोलून दाखवला. मात्र, बहिणीने तिला वेळीच सावरले आणि धीर दिला. त्यानंतर १५ मार्च रोजी पीडितेने राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांची वेगवान कारवाई

ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने राजापूर पोलिसांनी ‘शून्य’ (Zero FIR) क्रमांकाने गुन्हा नोंदवून तो वैभववाडी पोलिसांकडे वर्ग केला. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वैभववाडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून मयूर सुर्वे, ओंकार सुर्वे आणि पंकज पवार या तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:33 17-03-2026