पुणे: फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यासाठी यंदाचा हंगाम अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. हवामानातील सततचे बदल, लांबलेला पाऊस आणि थ्रिप्स व तुडतुड्या किडींच्या प्रादुर्भावामुळे कोकणातील आंबा उत्पादनात तब्बल ६० ते ७० टक्क्यांची घट झाली आहे. याचा थेट परिणाम पुणे मार्केटयार्डातील आवकेवर झाला असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूसचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
उत्पादन घटण्याची मुख्य कारणे:
१. पावसाचा परिणाम: यंदा कोकणात पाऊस जास्त काळ राहिल्याने जमिनीत ओलावा टिकून राहिला. ऑक्टोबरपर्यंत थंड वातावरण असल्याने सुरुवातीला मोहोर चांगला आला, मात्र नंतर झालेल्या तापमान बदलामुळे ‘वांजमोहोर’ येण्याचे प्रमाण वाढले. २. किडींचा प्रादुर्भाव: कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत थ्रिप्स आणि तुडतुड्या (हॉपर) या किडींनी मोहोर व कोवळ्या फळांवर हल्ला केल्याने मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली. ३. उष्णतेची लाट: फेब्रुवारी-मार्चमधील आर्द्रता आणि अचानक आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे उरलेल्या फळांच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे.
मार्केटयार्डात आवक घटली, दर तेजीत
पुणे मार्केटयार्डात दरवर्षी मार्चच्या मध्यात २ ते ३ हजार पेट्यांची आवक होते, मात्र यंदा ही आवक केवळ १५० ते २०० पेट्यांवर मर्यादित राहिली आहे. १९ मार्चला गुढीपाडवा असल्याने हापूसची मागणी वाढली आहे, मात्र पुरवठा कमी असल्याने भाव कडाडले आहेत:
- हापूसचा दर: सध्या बाजारात एक डझन हापूससाठी १,५०० ते ३,५०० रुपयांपर्यंत मोजावे लागत आहेत.
- अक्षय्य तृतीयेची प्रतीक्षा: सामान्य ग्राहकांना हापूसची चव चाखण्यासाठी आता अक्षय्य तृतीयेपर्यंत वाट पाहावी लागण्याची चिन्हे आहेत.
“यंदा बदलते हवामान आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे केवळ ३० ते ४० टक्के उत्पादन हाती लागले आहे. यामुळे बाजारात दर तेजीत राहण्याची शक्यता आहे.” — करण जाधव, आंबा व्यापारी, मार्केटयार्ड
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:09 17-03-2026














