खेड (रत्नागिरी): पाळीव कोंबड्या आणि हंसांच्या आवाजामुळे झोप मोड होत असल्याच्या कारणावरून खेड तालुक्यातील तिसे येथे एका वकिलावर खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात दोन भावांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ॲड. नवाबखान निझाम अहमद तिसेकर (वय ५५ वर्षे, रा. तिसे, ता. खेड) हे रविवारी, १५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी होते. यावेळी त्यांच्या घराबाहेर कोणीतरी जोरात शिवीगाळ करत असल्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने ॲड. तिसेकर घराचा दरवाजा उघडून बाहेर आले असता, समोर आरोपी असिफअली महमद तिसेकर हा हातात दगड घेऊन उभा होता.
‘तुझ्या हंसांमुळे माझी झोप मोड होते’
आरोपी असिफअली याने फिर्यादींना उद्देशून, “तुझ्या कोंबड्या आणि हंस दुपारी ओरडतात, त्यामुळे माझी झोप मोड होते,” असे बोलून रागाच्या भरात एक दगड हंसावर भिरकावला. त्यानंतर त्याने दुसरा दगड थेट फिर्यादी ॲड. तिसेकर यांच्या दिशेने फेकला, जो त्यांच्या डाव्या खांद्याला लागून ते जखमी झाले.
एवढ्यावरच न थांबता, आरोपीने रागाच्या भरात जवळच असलेले धान्य दळण्याचे दगडी जाते उचलले आणि ते फिर्यादींच्या अंगावर फेकून मारण्यासाठी धावून आला.
दोन्ही भावांविरुद्ध गुन्हा दाखल
या वादात आरोपी असिफअलीचा सख्खा मोठा भाऊ जहिर अली तिसेकर हा देखील सामील झाला. त्यानेही फिर्यादींना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर ॲड. तिसेकर यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी १९ मार्च २०२६ रोजी दुपारी १५:४२ वाजता या घटनेची नोंद घेत गुन्हा रजिस्टर नंबर ६३/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
खालील कलमान्वये झाली कारवाई:
- भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम: ११८(१) (धोकादायक शस्त्राने दुखापत), ३५२ (शांतता भंग), ३५१(२) (धमकावणे), १३१ आणि ३(५).
परिसरात तणावाचे वातावरण
पाळीव प्राण्यांच्या किरकोळ कारणावरून एका प्रतिष्ठित वकिलावर थेट दगडी जात्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने तिसे गावात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत असून, आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.














