अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम

अयोध्या : भगवान रामाची भूमी असलेल्या अयोध्येमध्ये दीपोत्सवात बुधवारी दोन विश्वविक्रम करण्यात आले. २५ लाख पणत्या प्रज्वलित करण्याचा तसेच सर्वाधिक म्हणजे ११२१ जणांनी एकाच वेळी आरती करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

हा अयोध्येतील आठवा दीपोत्सव आहे. यंदा तिथे रामचरितमानसमध्ये वर्णन केलेल्या प्रसंगांवर आधारित १८ चित्ररथ तयार करण्यात आले. त्यांची अयोध्येतील साकेत महाविद्यालयापासून ते रामकथा पार्कपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या दीपोत्सवाची आरती करण्यात आली. भगवान राम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांच्या भूमिकेत असलेल्या कलावंतांनी सज्ज असा रथ योगी आदित्यनाथ व अन्य भाविकांनी ओढला. (वृत्तसंस्था)

काशी, मथुरामध्येही परिवर्तन होईल : योगी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, अयोध्येचा झालेला कायापालट हा डबल इंजिन सरकारची कामगिरी आहे. काशी, मथुरामध्येही अयोध्येप्रमाणेच परिवर्तन होईल. अयोध्येत राम मंदिर उभे राहिले. भगवान राम अयोध्येत परत आले अशीच आमची भावना आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 31-10-2024