मुंबई: सिन्नरमधील अशोक खरात प्रकरणाने राजकीय वादळ निर्माण झाले असताना, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या रुपाली चाकणकर यांनी अखेर आपली मौन सोडले आहे. “संस्थेशी माझा संबंध केवळ सामाजिक आणि श्रद्धेपोटी होता, मात्र समोरच्या व्यक्तीचे कृत्य इतके भयानक असेल याची पुसटशी कल्पनाही नव्हती,” असे म्हणत त्यांनी आपल्यावरील आरोपांचा तीव्र निषेध केला आहे.
उपमुख्यमंत्र्यांकडे सोपवला राजीनामा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. ‘देवगिरी’ बंगल्यावर झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. या राजीनाम्यामुळे महिला आयोगाचे अध्यक्षपद आता रिक्त झाले आहे.
‘शिवलिका संस्थान’ आणि पाद्यपूजेवर स्पष्टीकरण
राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चाकणकर यांनी आपली बाजू मांडली:
- कार्यकाळाबाबत स्पष्टता: “मी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष असल्यापासून या संस्थानशी जोडली गेले होते. मात्र, ८ ऑगस्ट २०२५ रोजीच माझा या संस्थेतील कार्यकाळ संपला होता,” असे त्यांनी स्पष्ट केले.
- श्रद्धेचा विषय: व्हायरल झालेल्या फोटोंवर बोलताना त्या म्हणाल्या, “सामाजिक आयुष्यात आपण कोणाला तरी गुरु मानतो, त्या श्रद्धेतून मी तेथील शैक्षणिक आणि महाशिवरात्रीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहायचे. गुरुपौर्णिमेला केलेली पाद्यपूजा हा निव्वळ श्रद्धेचा भाग होता.”
- धक्कादायक वास्तव: अशोक खरात याच्यावर झालेल्या आरोपांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, त्या व्यक्तीचे कृत्य इतके नीच आणि भयानक असेल, याची कल्पना नसल्याने बातमी ऐकून धक्का बसला आहे.
खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना इशारा
आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत चाकणकर यांनी कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आहेत. “माझ्याविरोधात जाणीवपूर्वक चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या पसरवून माझी बदनामी केली जात आहे. ज्यांनी हे कृत्य केले आहे, त्यांना मी कायदेशीर नोटीस पाठवणार आहे,” असा इशारा त्यांनी दिला.
प्रकरणाची व्याप्ती वाढणार?
अशोक खरात याच्या पेन ड्राईव्हमधील ५८ व्हिडिओंनी राजकारण्यांची झोप उडवली आहे. चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी कोणत्या दिशेला जाते आणि त्यात आणखी कोणाची नावे समोर येतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 21-03-2026














