रत्नागिरी : गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला असून, हवेत हलका गारवा निर्माण झाला आहे. रात्री थंडी पडू लागली असून, धुकेही मोठ्या प्रमाणावर पडत आहे. थंडीमुळे आंबा कलमाच्या मुळावर ताण येऊन आंबा मोहोर सुरू होतो. मात्र, यंदा अपेक्षित थंडी अद्याप न पडल्याने यंदाचा आंबा हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच हा हंगाम लांबण्याचीही शक्यता बागायतदारांतून व्यक्त करण्यात येत आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यातच पाऊस ऑक्टोबरच्या मध्यांतरापर्यंत लांबला. परतीचा पावसाबरोबर अवकाळी पावसानेही किनारपट्टी भागाचा पिच्छा सोडला नाही. ऑक्टोबर महिन्यात दुसऱ्या पंधरावड्यातही पावसाचा मुक्काम होता. त्यामुळे ऑक्टोबर सरत आला तरी अपेक्षीत थंडीची प्रतीक्षा बागायतदारांमध्ये आहे. ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा कडाका सर्वाधिक होता. आता दिवाळीच्या दिवसात हवेत गारठा सुरू झाला आहे; मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. दिवाळीत पडणाऱ्या थंडीतच कलमे मोहरू लागतात. वातावरण कोरडे असल्याने कलमे मोहरण्याची प्रतीक्षा करावी लागेल.
वातावरणाच्या स्थितीवर आंबा अवलंबून
यावर्षी अद्याप थंडी पडलेली नाही. त्याउलट ऑक्टोबर हिटचा सामना करवा लागत आहे. वातावरण बदलल्यास कलमांना मोहर येईल; मात्र त्यासाठी यंदा नोव्हेंबर महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या काही दिवसात थंडी वाढली तर मोहर चांगला होऊन फेब्रुवारी मार्चमध्ये आंबा बाजारात येईल. मात्र, वातावरण प्रतिकूल राहिल्यास आंवा बाजारात दाखल होण्यास एप्रिल महिनाही उजाडेल, अशी माहिती आंबा व काजू बागायतदार राजन वाडकर यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 31/Oct/2024














