रत्नागिरीत आकाराला येणार भव्य ‘पत्रकार भवन’!

रत्नागिरी: “पत्रकार भवनमध्ये केवळ बातम्यांचे संकलन होणार नाही, तर येथे ग्रंथालय, अभ्यासिका आणि निवासाची उत्तम सोय असेल. या माध्यमातून पत्रकार बांधवांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करून जिल्ह्यातून आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) अधिकारी निर्माण करावेत. त्यासाठी आवश्यक तो सर्व निधी दिला जाईल,” अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.

मिरजोळे एमआयडीसी येथे नियोजित पत्रकार भवन इमारतीचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण शनिवारी डॉ. सामंत यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

१ कोटी ३६ लाखांचे अद्ययावत भवन

मिरजोळे एमआयडीसी परिसरात १ कोटी ३६ लाख रुपये खर्चून ही भव्य इमारत उभी राहत आहे. या इमारतीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे असतील:

  • अद्ययावत अभ्यासिका आणि ग्रंथालय: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी.
  • निवासी सोय: पत्रकारांच्या पाल्यांना राहून अभ्यास करण्यासाठी विशेष व्यवस्था.
  • भव्य सभागृह: विविध कार्यक्रम आणि कार्यशाळांसाठी उपलब्ध.

सोशल मीडियाच्या आक्रमणावर आत्मचिंतनाची गरज

मार्गदर्शन करताना डॉ. सामंत म्हणाले, “आज वर्तमानपत्रांवर सोशल मीडियाचे मोठे आक्रमण झाले आहे. या आक्रमणामुळे सर्वच स्तरावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली असून, सोशल मीडियासाठी कुठेतरी आचारसंहिता आखण्याची गरज आहे.” रत्नागिरीतील पत्रकारितेचा दर्जा उंचावण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून येथे कार्यशाळा घेतल्या जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“रत्नागिरीतील प्राईम लोकेशनवरील पत्रकार भवनच्या जागेचा प्रश्न ज्येष्ठ पत्रकारांनी एकत्र येऊन सोडविल्यास, त्या जागेसाठीही ५ कोटी रुपये दिले जातील. तिथे राज्यातील एक अद्ययावत मॉडेल उभे करू.”डॉ. उदय सामंत, पालकमंत्री

कोकणचा पत्रकारितेतील वारसा

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असताना एलफिन्स्टन कॉलेजमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे तैलचित्र लावल्याची आठवण सांगत, मराठीसोबतच हिंदी पत्रकारितेची सुरुवातही कोकणातून झाल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. पत्रकारांसाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, प्रांताधिकारी जीवन देसाई, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, प्रमोद कोनकर, अलिमियाँ काझी, किशोर मोरे, हेमंत वणजु ,सतीश कामत यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गज पत्रकार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत सातपुते यांनी केले, तर आभार अलिमियाँ काझी यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत गोडबोले यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 23-03-2026