रत्नागिरी : दिवाळीत अभ्यंगस्नान लक्ष्मीपूजनाला मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यातच निवडणुकांमुळे बहुतांश दिवाळीच्या कार्यक्रमांना राजकीय किनार लाभणार आहे. त्यामुळे क्षणिक आनंदासाठी लाखो रुपयांचा धूर निघणार आहे. या धुरातून हवेत पसरणाऱ्या विविध रासायनिक घटकांमुळे विविध आजार बळावण्याचा धोका संभवतो. तसेच पर्यावरणासह आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.
दिवाळी हा प्रकाशाचा सण असल्याने फटाक्यांच्या आतषबाजीला विशेष महत्त्व दिले जाते. अभ्यंग स्नानादिवशी भल्या पहाटे फटाके फोडण्याची परंपरा आहे. त्यातच यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गासह सर्वच स्तरामध्ये दिवाळीचा उत्साह वाढला आहे. या उत्साहाच्या भरात रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची खरेदी-विक्री होत आहे. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल होत असून लक्ष्मी पूजनापर्यंत ती कायम राहणार आहे. फटाक्यांसाठी प्रदूषण मंडळाने आवाजाची मर्यादा निर्धारित केली असली तरी तिचे काटेकोर पालन किती होणार हा संशोधनाचा विषय ठरणार आहे.
निवडणुकांच्या दरम्यान विधानसभा उत्सवकाळातील पार्श्वभूमीवर कार्यक्रमांना राजकीय किनार लाभणार असल्याने फटाक्यांच्या आवाजात आणखी भर पडणार आहे. परंपरेनुसार फटाक्यांसह दिवाळीतील धार्मिक संस्कार व संस्कृती जोपासण्यात आली असली तरी फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणाने आरोग्याचा प्रश्न मात्र ऐरणीवर येणार आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदुषण व बदलते हवामान यामुळे मानवी आरोग्यासह जीवसृष्टीला हानी पोहचत आहे. त्यासाठी शासन व सामाजिक संस्थांच्यावतीने फटाकेमुक्त दिवाळीसाठी सर्व स्तरावर जनजागृती करण्यात येत असून शाळांसह गावोगावच्या ग्रामपंचायतींनाही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी फटाके न फोडण्याची शपथ घेतली आहे.
परंतू बाजारपेठेत होणाऱ्या फटाक्यांच्या अर्थकारणामुळे क्षणिक आनंदासाठी लाखो रुपयांचा धूर निघणार असल्याचे स्पष्ट होत आहे. फटाक्यांमुळे प्रदुषणाचे दुष्परिणाम पुढील काही दिवस जनसामान्यांना सोसावे लागणार आहेत.
श्वसनविकार वाढण्याचा धोका औद्योगिक कारखाने व वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे हवेत कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. त्यातच फटाक्यांच्या धुरामुळे आणखी भर पडणार आहे. पारंपरिक फटाक्यांमध्ये अॅल्युमिनियम, बॅरीयम, पोटॅशियम नायट्रेट व कार्बन या घटकांचा वापर केला जातो. हे फटाके फोडल्यानंतर हे सर्व घटक हवेत मिसळतात. हवा प्रदूषणामुळे दमा, अस्थमासारखा श्वसनविकार वाढण्याचा धोका संभवतो.
वृद्ध, बालके व गरोदर मातांची विशेष काळजी…
मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषणाने लहान बालकांच्या कानाच्या पडद्यांना हानी पोहोचत असल्याने दिवाळीच्या काळात मातांना लहानग्या बाळांची किरकिर सहन करावी लागणार, वयोवृद्धांच्या हृदयाचे ठोके वाढून अनेकांना उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवू शकतो. वातावरणातील शांतता भंग पावल्याने ताणतणावही वाढणार असून, मधुमेहींच्या रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढू शकते. हृदयविकार रुग्ण, गरोदर माता, लहान बालके यांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 31/Oct/2024














