रत्नागिरीत ‘डिजिटल अरेस्ट’चा मोठा फटका! सेवानिवृत्त व्यक्तीला २५ लाखांचा गंडा; दहशतवादी हल्ल्याची दाखवली भीती

रत्नागिरी (जयगड): “तुमचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आहे” आणि “तुमच्या खात्यातून २ कोटींचे मनी लॉन्ड्रिंग झाले आहे” अशी खोटी भीती दाखवून रत्नागिरीतील एका ६१ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला तब्बल २५ लाख २७ हजार रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest) नावाच्या नवीन फसवणुकीच्या प्रकाराचा वापर करून ही मोठी लूट केली आहे.

नेमकी घटना काय?

साखरी बौद्धवाडी (जयगड) येथील रहिवासी सुधाकर लक्ष्मण जाधव (वय ६१) यांनी याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. १७ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत तीन अज्ञात आरोपींनी संगनमताने हा कट रचला.

आरोपींनी जाधव यांना फोन करून आपण ‘नाशिक पोलीस’ बोलत असल्याचे भासवले. तुमच्या नावे खारघर पोलीस ठाण्यात गंभीर तक्रार असून, २ कोटींच्या बेकायदेशीर व्यवहाराचा तपास सुरू असल्याचे त्यांना सांगण्यात आले. जाधव यांना मानसिक दडपणाखाली ठेवण्यासाठी आरोपींनी त्यांना व्हॉट्सॲप कॉलवर ‘डिजिटल अरेस्ट’ राहण्यास भाग पाडले.

बनावट कागदपत्रांचा वापर

फिर्यादींचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी पोलीस विभागाचे लोगो असलेले बनावट पत्र पाठवले. त्यावर सुधाकर जाधव यांचे नाव, आधार कार्ड क्रमांक आणि फोटो छापलेला होता. “तुमच्या खात्यातील पैसे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला तपासावे लागतील, तपासणीनंतर ते पुन्हा मिळतील,” असे सांगून आरोपींनी त्यांना घाबरवून सोडले.

२५ लाखांची रक्कम उकळली

बँक खाते ‘व्हेरीफाय’ करण्याच्या बहाण्याने आरोपींनी जाधव यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण २५ लाख २७ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. ही मोठी रक्कम भरल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी पोलिसांत धाव घेतली.

पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल

याप्रकरणी जयगड पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे:

  • कलम: ३१८(४), ३१९(२), ३३६(२), ३३६(३), ३४०(२), २०४, ३(५)
  • IT Act: ६६ (क), ६६ (ड)
  • गुन्हा रजिस्टर नंबर: १५/२०२६

पोलीस आवाहन: ‘डिजिटल अरेस्ट’ला बळी पडू नका!

कोणताही पोलीस विभाग किंवा सरकारी यंत्रणा अशा प्रकारे व्हॉट्सॲप कॉलवर कोणालाही अटक करू शकत नाही किंवा खात्यातील पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत नाही. अशा संशयास्पद फोन कॉलला घाबरू नका आणि तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा, असे आवाहन रत्नागिरी पोलिसांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 23-03-2026