रत्नागिरी पॅसेंजर दादरमधून बंद केल्यास तीव्र आंदोलन; कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचा इशारा

चिपळूण: कोकण रेल्वे मार्गावर गेली ३२ वर्षे अविरत सेवा देणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे प्रशासनाने बंद केल्यामुळे कोकणवासियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयाच्या विरोधात आणि चिपळूण-दादर स्वतंत्र गाडीच्या मागणीसाठी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीने आता आक्रमक पवित्रा घेतला असून, मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

कोरोना काळापासून दादर-रत्नागिरी पॅसेंजरची सेवा विस्कळीत झाली होती. ही गाडी सध्या केवळ दिव्यापर्यंतच चालवली जात आहे. कोकणवासीयांची मागणी होती की ही गाडी पूर्वीप्रमाणे मुंबईतील दादर स्थानकावरूनच सुटावी. मात्र, मध्य रेल्वेने या मागणीकडे दुर्लक्ष करत, या गाडीच्या जागेवर उत्तर प्रदेशातील प्रवाशांसाठी दादर-गोरखपूर ट्रेन कायमस्वरूपी सुरू केली आहे.

‘कोकणचा हा अपमान आहे’ – शौकत मुकादम

कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की:

“कोकणवासीयांची गैरसोय दूर करण्याऐवजी रेल्वे प्रशासनाने युपीच्या गाडीचा मार्ग मोकळा करून कोकणावर अन्याय केला आहे. दादर-रत्नागिरी पॅसेंजरमध्ये पूर्वी संगमेश्वर, चिपळूण आणि खेड या स्थानकांसाठी आरक्षित डबे असायचे. मात्र, रेल्वे मंत्रालयाने आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखवून गोरखपूर ट्रेन सुरू केली, हा संपूर्ण कोकणचा अपमान आहे.”

समितीच्या प्रमुख मागण्या:

१. दादर-रत्नागिरी पॅसेंजर तात्काळ पूर्ववत दादर स्थानकावरून सुरू करावी. २. चिपळूण-दादर स्वतंत्र गाडीची मागणी मान्य करावी. ३. कोकणातील प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षित डब्यांची व्यवस्था पुन्हा लागू करावी.

आंदोलनाचा इशारा

मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीने आता आरपारच्या लढाईची तयारी केली आहे. जर दादर पॅसेंजर रत्नागिरी आणि दादर-चिपळूण या गाड्या त्वरित सुरू झाल्या नाहीत, तर मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा शौकत मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

या निर्णयामुळे चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत असून, आता सरकार आणि रेल्वे प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:47 23-03-2026