पोर्ले तर्फ ठाणे: जोतिबा डोंगरावर रविवारी परिते (ता. करवीर) गावातील सासनकाठी पूजन सोहळ्यादरम्यान मोठा राडा झाला. आरती सुरू असताना काही भाविकांनी केलेल्या हुल्लडबाजीमुळे संतापलेल्या पुजाऱ्यांनी भाविकांना मारहाण केल्याने मंदिरात एकच गोंधळ उडाला. अखेर परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी परितेच्या सरपंचांनी लेखी माफीनामा दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.
सासनकाठी पूजनावेळी नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी परिते गावाची यात्रा असल्याने परंपरेनुसार ५०० हून अधिक ग्रामस्थ मानाची सासनकाठी घेऊन जोतिबा डोंगरावर आले होते. सकाळी ११ ते १२ च्या सुमारास मंदिरात आरती आणि प्रदक्षिणा सुरू असताना काही अतिउत्साही तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली. देवस्थानचे कर्मचारी आणि पुजाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र हुल्लडबाजांनी ऐकले नाही.
आरतीत अडथळा आणि गुलालफेक
हुल्लडबाजी करणाऱ्यांनी केवळ गोंधळच घातला नाही, तर आरतीमध्ये अडथळा निर्माण केला. काही पुजाऱ्यांच्या अंगावर गुलाल फेकणे आणि त्यांच्या टोप्या उडवण्याचे प्रकार घडले. यामुळे संतापलेल्या पुजाऱ्यांनी हुल्लडबाजांना मंदिरातून बाहेर ओढून चोप देण्यास सुरुवात केली. मारहाणीच्या भीतीने अनेक भाविक सैरावैरा पळू लागले, तरीही त्यांना शोधून मारहाण करण्यात येत होती. यामुळे मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सरपंचांचा पुढाकार आणि माफीनामा
घटनेचे गांभीर्य ओळखून परितेचे सरपंच विजय ऊर्फ मनोज पाटील यांनी तातडीने मध्यस्थी केली. मंदिरात नेमका काय प्रकार घडला याची पूर्ण माहिती नसली, तरी पुजारी आपल्या गावातील लोकांना शोधत असल्याचे समजताच त्यांनी परिस्थिती सावरली. सरपंचांनी जोतिबा देवस्थान समितीकडे घडलेल्या प्रकाराबद्दल लेखी माफीनामा लिहून दिला. त्यानंतर पुजाऱ्यांनी मारहाण थांबवली आणि सर्व भाविक सासनकाठीसह परतीच्या प्रवासाला निघाले.
“पारंपरिक प्रथेनुसार आम्ही ५०० लोक सासनकाठी पूजनासाठी गेलो होतो. मंदिरात काय घडले याची कल्पना नाही, पण परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून आम्ही देवस्थान कमिटीला माफीनामा लिहून दिला आणि प्रकरणावर पडदा पाडला.” — मनोज पाटील (सरपंच, परिते)
धार्मिक स्थळांवरील शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे धार्मिक स्थळांवर भाविकांनी पाळावयाची शिस्त आणि उत्साहाच्या भरात होणारी हुल्लडबाजी यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. यात्रेच्या उत्साहात परंपरेला गालबोट लागू नये, अशी अपेक्षा आता जोतिबा भक्तांकडून व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:20 23-03-2026














