रत्नागिरी: जिल्ह्यातील लघु उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि प्रक्रियादारांना आपल्या उत्पादनांसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी रत्नागिरीतील जयेश मंगल कार्यालय येथे विशेष जिल्हास्तरीय ‘खरेदीदार व विक्रेता संमेलनाचे’ (Buyer-Seller Meet) आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत होणाऱ्या या संमेलनात जिल्ह्यातील कृषी उत्पादनांना थेट बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
संमेलनाची वैशिष्ट्ये आणि फायदे
या संमेलनाच्या माध्यमातून रत्नागिरीतील प्रक्रियादार आणि शेतकऱ्यांना आपली उत्पादने मोठ्या खरेदीदारांसमोर थेट सादर करता येणार आहेत. व्यवसायाचा विस्तार करणे, नवीन ग्राहक शोधणे आणि बाजारपेठेतील कल समजून घेणे यासाठी हे व्यासपीठ अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
- थेट व्यवहार: खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात थेट संवाद होऊन व्यवसायाची संधी उपलब्ध होईल.
- सामंजस्य करार (MoU): या संमेलनादरम्यान खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात अधिकृत व्यापार करार घडवून आणण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
- तज्ज्ञांचे मार्गदर्शन: व्यवसायातील तांत्रिक बाबींवर चर्चा करण्यासाठी विविध परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकणच्या मेव्याला मिळणार ‘व्हॅल्यू’: फणस प्रक्रिया कार्यशाळा
या संमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘फणस प्रक्रिया’ विषयावरील अभ्यासपूर्ण कार्यशाळा. कोकणचा मेवा समजल्या जाणाऱ्या फणसापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ कसे बनवायचे, त्यांचे आहारातील महत्त्व आणि मूल्यवर्धनातून आर्थिक नफा कसा मिळवायचा, याचे मार्गदर्शन येथे मिळणार आहे. फणस उत्पादकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
सहभागासाठी ‘येथे’ संपर्क साधा
या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी खालील अधिकाऱ्यांकडे आपली नोंदणी करावी:
- खरेदीदार (Buyers): शत्रुघ्न म्हात्रे, तालुका कृषी अधिकारी, चिपळूण (मो. ९१८५२०८०८४)
- विक्रेता (Sellers): अमोल सपकाळ, तालुका कृषी अधिकारी, राजापूर (मो. ९०२८७९०७४१)
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी कंपन्या, महिला बचत गट आणि अन्न प्रक्रिया उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आणि ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजय बेटीवार यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 24-03-2026














