चिपळूण : राधाकृष्ण नगर येथे ड्रेनेजची टाकी थेट गटारात बसवल्याचा प्रकार

चिपळूण : शहरातील राधाकृष्ण नगर येथे ड्रेनेज टाकी गटारात बसवल्याचा प्रकार समोर आला आहे. या विरोधात नागरिकांमधून ओरड सुरू असून, माजी नगरसेवक व शिवसेनेचे शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनीही पालिका प्रशासनाच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शहरातील राधाकृष्ण नगर येथे एका इमारतीच्या लगत असलेल्या गटारातमध्ये ड्रेनेजची टाकी बसवण्यात आली आहे. हा प्रकार काही महिन्यापूर्वी घडला होता. त्या गटारातून सांडपाणी वाहत जात असल्याने परिसरात रोगराई पसरण्याची भीती होती. त्यावरून के नागरिकांमधून तक्रारी आल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तक्रारी वाढल्यामुळे पालिकेचे प्रशासकीय अधिकारी, बांधकाम व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने दखल घेत ड्रेनेजची टाकी गटारातून काढत बाजूला केली होती; मात्र काही महिन्यातच पुन्हा त्याच ठिकाणी ड्रेनेजची टाकी ठेवण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या टाकीमुळे गटारातून सांडपाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. सांडपाणी तुंबून ते रस्त्यावर येते. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या विषयी माजी नगरसेवक मोदी यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर संशय व्यक्त केला आहे. ज्या गटारात ड्रेनेजची टाकी बसवण्यात आली त्या जागेची सरकारी मोजणी करण्यात आली आहे. त्यानुसार ती जागा तेथील बांधकाम व्यावसायिकाच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे हा प्रश्न सामोपचाराने सोडवण्याच्या हालचाली सुरू आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 31/Oct/2024