रत्नागिरी: उक्षी-भेळी येथील बेपत्ता व्यक्तीचा बावनदी पात्रात मृतदेह आढळला

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील उक्षी-भेळी चिंचपार येथील बेपत्ता असलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह करबुडे येथील बावनदीच्या पात्रात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दीपक शांताराम गोणबरे असे मृत व्यक्तीचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे उक्षी गावावर शोककळा पसरली आहे.

कोणालाही न सांगता घराबाहेर पडले होते दीपक

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक गोणबरे हे आपल्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले होते. कुटुंबाने सर्वत्र शोध घेऊनही ते मिळून न आल्याने अखेर त्यांची पत्नी सौ. दिक्षा दीपक गोणबरे यांनी २२ मार्च २०२६ रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांत या प्रकरणाची बेपत्ता नोंद क्रमांक १२/२०२६ नुसार दखल घेण्यात आली होती.

ग्रामस्थांकडून राबवण्यात आली मोठी शोध मोहीम

दीपक गोणबरे यांना शोधण्यासाठी उक्षी गावातील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी कंबर कसली होती. बावनदीच्या पात्रात होडीच्या सहाय्याने, तसेच आजूबाजूच्या दाट जंगलमय भागात आणि डोंगरदऱ्यात शोध मोहीम राबवण्यात आली.

या शोध मोहिमेत पोलीस पाटील अनिल जाधव, जुनेद खान, भागेश जाधव, दुर्गेश जाधव, संदीप जाधव, मनोहर गोणबरे, संतोष देवळेकर, युसूफ हमदारे, असिर हमदारे, मुकद्दस काझी, मुदस्सिर काझी आणि मुझम्मील काझी या तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

करबुडे येथे नदीपात्रात आढळला मृतदेह

२४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास करबुडे येथील बावनदीच्या ‘पवार कोंड’ नदीपात्रात एक मृतदेह तरंगताना ग्रामस्थांना दिसून आला. तपासणीअंती हा मृतदेह बेपत्ता असलेल्या दीपक गोणबरे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच माजी सरपंच मिलिंद खानविलकर, करबुडेचे पोलीस पाटील हरीश वेदरे, अब्दुल मुनाफ खतीब, रवींद्र जाधव आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

पोलीस तपास आणि वैद्यकीय कार्यवाही

रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाची नोंद बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये (अकस्मात मृत्यू) केली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी विशेष वैद्यकीय सहकार्य केले.

दीपक गोणबरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, भाऊ, वहिनी आणि पुतणी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे उक्षी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:24 25-03-2026