लांजा: मठ येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथाचा ११०वा चैत्रोत्सव २८ मार्चपासून; धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

लांजा (रत्नागिरी): तालुक्यातील मठ येथील जागृत देवस्थान श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथाचा ११०वा वार्षिक चैत्रोत्सव येत्या शनिवारपासून, २८ मार्च २०२६ पासून मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. २ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक, पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांसाठी हा मोठा भक्तीचा सोहळा असणार आहे.

नव्या मंदिरातील १४ वा उत्सव

नव्या मंदिराच्या प्रांगणातील हा १४ वा उत्सव असून, यावर्षीच्या चैत्रोत्सवाची संपूर्ण सेवा ठाण्यातील सौ. विलासिनी आणि श्री. विलास मनोहर तांबे आणि कुटुंबीयांकडे आहे. उत्सवाची सांगता ३ एप्रिल रोजी पहाटे लळिताच्या कीर्तनाने होईल.

उत्सवाचे सविस्तर वेळापत्रक:

  • २८ मार्च (शनिवार): दुपारी ३ वा. श्रींची चतुःषष्टी राजोपचार पूजा. रात्री १०:३० वाजल्यापासून स्थानिक कलाकारांचे गुणदर्शन कार्यक्रम.
  • २९ मार्च ते २ एप्रिल: दररोज सकाळी ८ ते दुपारी २:३० वाजेपर्यंत पूजा, अभिषेक, आरती आणि महाप्रसाद.
  • विशेष याग सेवा: * २९ मार्च: सौरयाग
    • ३० मार्च: रुद्र स्वाहाकार
    • ३१ मार्च: गणेशयाग/नवचंडी
    • १ एप्रिल: विष्णुयाग
    • २ एप्रिल: दत्तयाग

कीर्तन आणि सांस्कृतिक मेजवानी

  • कीर्तन सेवा: २९ मार्च ते १ एप्रिल दरम्यान दररोज रात्री ९ ते १२ या वेळेत पुण्यातील ह.भ.प. मकरंदबुवा सुमंत रामदासी यांची कीर्तने होतील. ३ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता ह.भ.प. अमेयबुवा गुण्ये रामदासी यांचे लळिताचे कीर्तन होईल.
  • संगीतरजनी: २ एप्रिल रोजी रात्री ९:३० वाजता प्रसिद्ध गायक अजिंक्य पोंक्षे यांचा ‘संगीतरजनी’ हा अभंग, भक्तीगीते आणि नाट्यगीतांचा कार्यक्रम होईल. त्यांना सुशील गद्रे, विश्वास जोशी आणि कैलास दामले यांची साथसंगत लाभणार आहे.
  • इतर कार्यक्रम: ३१ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत महालक्ष्मी कुंकुमार्चन आणि हळदी-कुंकू सोहळा संपन्न होईल.

भक्तनिवासासाठी मदतीचे आवाहन

श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानाचे अध्यक्ष मंदार हळबे, उपाध्यक्ष श्रीनिवास गुण्ये, चिटणीस नंदकुमार नेवाळकर आणि खजिनदार श्रेयस मुळ्ये यांनी सर्व भाविकांना उत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या देवस्थानच्या भक्तनिवासाचे बांधकाम सुरू असून, भाविकांनी यासाठी सढळ हस्ते आर्थिक मदत करावी, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.


संपर्क आणि नोंदणी:

  • याग नोंदणी: अभय देवस्थळी (9421188139) / दीपक भाट्ये (9423875453)
  • पूजा/अभिषेक माहिती: श्रेयस मुळ्ये (9405917567) / उमेश आंबर्डेकर (9423292437)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:32 25-03-2026