नवी दिल्ली: घरगुती एलपीजी (LPG) सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्ये बदल झाल्याचा दावा करणाऱ्या काही बातम्या आणि सोशल मीडिया पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. मात्र, केंद्र सरकारने हे सर्व दावे फेटाळून लावले असून ते निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. गॅस बुकिंगसाठी ग्राहकांच्या श्रेणीनुसार वेगवेगळा कालावधी निश्चित केल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असं सरकारनं म्हटलं आहे.
काय होती अफवा?
काही सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा केला जात होता की, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना पुढील गॅस बुक करण्यासाठी ४५ दिवस वाट पाहावी लागेल. तर, इतर सामान्य ग्राहकांसाठी हे बुकिंग २५ ते ३५ दिवसांच्या अंतराने करता येईल. मात्र, सरकारने असा कोणताही नवीन नियम लागू केलेला नाही.
नेमका नियम काय?
सरकारच्या स्पष्टीकरणानुसार, सध्या देशात जुनेच नियम लागू आहेत आणि त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही:
- शहरी भाग: ग्राहकांसाठी गॅस बुकिंगसाठी २५ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
- ग्रामीण भाग: ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ४५ दिवसांचा कालावधी निश्चित आहे.
- मोजणी कशी होते?: हा कालावधी मागील गॅस डिलिव्हरीच्या तारखेपासून मोजला जातो. जर एखाद्या ग्राहकाने या निश्चित वेळेपूर्वी बुकिंग करण्याचा प्रयत्न केला, तर सिस्टीमकडून ते बुकिंग आपोआप ब्लॉक केले जाईल.
जागतिक परिस्थिती आणि भारताची स्थिती
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ बंद असल्याने जागतिक पातळीवर एलपीजी पुरवठा प्रभावित झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांना पुरेसा गॅस मिळावा यासाठी सरकारने १४ किलोच्या सिलेंडरमध्ये ८ ते १० किलो गॅस भरण्याचे आदेश दिले आहेत.
असे असले तरी, देशात एलपीजीचा साठा पुरेसा आहे आणि कोणतीही टंचाई नाही, असे आश्वासन सरकारने दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन किंवा गडबडीत चुकीचे बुकिंग करू नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:32 25-03-2026














