चिपळूणमध्ये पत्रकारितेवर हल्ला! ‘चिपळूण नागरी’च्या १० ते १५ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल; मारहाण आणि साहित्य चोरीचा आरोप

चिपळूण (रत्नागिरी): रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर भ्याड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या गैरकारभाराविरुद्ध सुरू असलेल्या उपोषणाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले दूरदर्शनचे अधिकृत पत्रकार दीपक दिलीप भागवत आणि त्यांचे कॅमेरामन यांना पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात १० ते १५ कर्मचाऱ्यांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नेकी घटना काय घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार (रा. खेड) हे २५ मार्च २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर (बहादूरशेख नाका) उपोषणास बसणार होते. या उपोषणाचे वृत्तांकन करण्यासाठी रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथील पत्रकार दीपक भागवत आणि कॅमेरामन रुपेश साळुंखे तिथे पोहोचले होते.

पतसंस्थेचे कर्मचारी उपोषणकर्ते सुरेश पवार यांच्याशी वाद घालत असताना, पत्रकार दीपक भागवत हे आपला ‘बूम आयडी’ घेऊन तिथे गेले आणि कॅमेरामन शूटिंग करू लागले. याच वेळी पतसंस्थेच्या कार्यालयातील १० ते १५ कर्मचारी चिडून बाहेर आले. “तू कसला पत्रकार, तू कसले शूटिंग करतोस?” असे म्हणत त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून पत्रकारांवर हल्ला चढवला.


मारहाण आणि साहित्याची चोरी

आरोपींनी पत्रकारांना धक्काबुक्की करत लाथाबुक्क्यांनी आणि हाताच्या थापटांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर, भररस्त्यात शिवीगाळ आणि दमदाटी करून पत्रकारांच्या हातातील साहित्य हिसकावून घेतले. मारहाणीदरम्यान फिर्यादी दीपक भागवत यांच्या साईड बॅगेतील अधिकृत प्रेस आयडी आणि बॅगेतील इतर महत्त्वाचे साहित्य आरोपींनी जबरदस्तीने चोरून नेल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.


गंभीर कलमान्वये गुन्ह्याची नोंद

पत्रकार दीपक भागवत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिपळूण पोलिसांनी गुन्हा रजि. नं. ८२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील कलमांचा समावेश आहे:

  • भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३: कलम १८९(२), १९०, १९१(२), ३०३(२), ११५(२), ३५२, ३११(२), ३११(३).
  • विशेष कायदा: महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१७ चे कलम ४.

या घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रसारमाध्यम संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस आता या प्रकरणातील दोषी कर्मचाऱ्यांचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.