राजापूर (रत्नागिरी): रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील विलये, गुरववाडी येथे एका रिक्षा चालकाला अडवून त्याला कोयत्याने मारहाण केल्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमी चालकाच्या भावालाही कुऱ्हाड दाखवून धमकावण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात दोन सख्ख्या भावांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २४ मार्च २०२६ रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी संदीप दौलत गुरव (वय ३३, व्यवसाय: शेती व रिक्षा चालक) हे आपले चुलते सुभाष गुरव यांना दवाखान्यात नेण्यासाठी रिक्षा घेऊन जात होते. यावेळी त्यांच्याच वाडीतील आरोपी गणपत दत्ताराम मांडवकर याने फिर्यादीची रिक्षा अडवून विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
कोयता आणि कुऱ्हाडीने दहशत
संदीप गुरव यांनी शिवीगाळीबाबत विचारणा केली असता, आरोपी गणपत मांडवकर याने घरातून दोन कोयते आणले. याच वेळी त्याचा भाऊ राजेंद्र दत्ताराम मांडवकर याने फिर्यादीला समोरून घट्ट पकडून ठेवले आणि हाताच्या थापटांनी मारहाण केली. संधी साधून गणपत मांडवकर याने फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर कोयत्याच्या मागील बाजूने जोरात प्रहार करून दुखापत केली.
वाद वाढत असताना फिर्यादीचा भाऊ प्रफुल्ल गुरव तिथे पोहोचला. त्याला पाहताच आरोपी गणपत मांडवकर याने हातात कुऱ्हाड घेतली आणि “आता तुम्हाला ठार करतो” अशी भीषण धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली.
राजापूर पोलिसांत गुन्ह्याची नोंद
या हिंसक घटनेनंतर संदीप गुरव यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून राजापूर पोलिसांनी गुन्हा रजि. नं. ७१/२०२६ अन्वये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ मधील खालील कलमांचा समावेश आहे:
- कलम ११८(१): घातक शस्त्राने स्वेच्छेने दुखापत करणे.
- कलम ११५(२): स्वेच्छेने दुखापत करणे.
- कलम ३५२: शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे.
- कलम ३५१(१): गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे.
- कलम ३(५): समान उद्देशाने केलेले कृत्य.
या प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस करत असून, किरकोळ कारणावरून शस्त्रांचा वापर करून दहशत माजवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.














