चिपळूण: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात एका महाकाय मगरीच्या दर्शनाने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. शहरातील गजबजलेल्या मार्कंडी येथील तिरुमला परिसरात लोकवस्तीमध्ये अचानक मगर आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वन विभागाच्या सतर्कतेमुळे या मगरीला यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात आले आहे.
नेमकी घटना काय?
मार्कंडी तिरुमला परिसरात मगर असल्याचे सर्वप्रथम स्थानिक रहिवासी संदेश शेलार यांच्या निदर्शनास आले. मानवी वस्तीत मगर दिसताच त्यांनी कोणताही उशीर न करता तातडीने याची माहिती वन विभागाला दिली. भरवस्तीत मगर असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, त्यामुळे परिसरात घबराट पसरली होती.
वन विभागाचे धाडसी रेस्क्यू ऑपरेशन
घटनेची माहिती मिळताच वन विभागाची रेस्क्यू टीम अत्याधुनिक पिंजऱ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अतिशय कौशल्याने टीमने मगरीला जेरबंद केले. मगरीची प्रकृती उत्तम असल्याची खात्री केल्यानंतर, वरिष्ठांच्या आदेशानुसार तिला मानवी वस्तीपासून दूर सुरक्षित ठिकाणी तिच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली मोहीम
हे यशस्वी बचावकार्य खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले:
- गिरीजा देसाई पाटील (विभागीय वन अधिकारी)
- श्रीम. प्रियंका लगड (सहायक वनसंरक्षक)
- एस. एस. खान (वन परिक्षेत्र अधिकारी)
रेस्क्यू टीममधील सदस्य: या मोहिमेत वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक राहुल गुंठे, कृष्णा इरमले, शिवराज शिर्के, अजय बडदे आणि सुरेंद्र भोंडवे यांचा मोलाचा सहभाग होता.
शहरवासीयांकडून कौतुक
चिपळूणच्या भरवस्तीत मगरीचा शिरकाव झाल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. परंतु, वन विभागाने दाखवलेले धाडस आणि तत्परतेमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. वन विभागाच्या या कामगिरीचे संपूर्ण चिपळूण शहरात कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
08:41 27-03-2026














