चिपळूण/कराड: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा चिपळूण-कराड राष्ट्रीय महामार्ग पुढील दोन महिने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाटण येथील धांडे पुलाचे बांधकाम आणि बाजारपेठेतील रस्त्याचे काँक्रिटीकरण ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहतुकीवर मर्यादा: २७ मार्च ते २७ मे
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ते २७ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हा मार्ग बंद असेल. पावसाळ्यात वाहतूक ठप्प होऊ नये, या उद्देशाने प्रशासनाने ही महत्त्वाची कामे हाती घेतली आहेत.
असे असतील ‘पर्यायी मार्ग’
महामार्ग बंद असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी खालीलप्रमाणे वाहतूक वळवण्यात आली आहे:
- कराड-उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी अवजड वाहतूक: कराड-उंब्रज – राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ – पाचवड – उंडाळे – कोकरूड – मलकापूर – संगमेश्वर मार्गे चिपळूण.
- चिपळूणकडून कराडकडे जाणारी अवजड वाहतूक: चिपळूण – संगमेश्वर – आंबा घाट मार्गे कराड.
- हलकी वाहने (कार/जीप): कराड/उंब्रज येथून नवा रस्ता – गव्हाणवाडी फाटा – नेरळे – गौंड मार्गे चिपळूण.
एसटी आणि उद्योगांना मोठा फटका
कुंभार्ली घाटातून होणारी वाहतूक बंद झाल्याचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन मंडळाला (ST) बसणार आहे.
- मार्गात बदल: खेड, दापोली, गुहागर, मंडणगड आणि चिपळूण डेपोच्या गाड्या आता आंबा घाट मार्गे वळवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन खर्च वाढणार असल्याने एसटीचे आर्थिक नुकसान होणार आहे.
- मालवाहतूक बाधित: लोटे परशुराम आणि चिपळूणमधील रासायनिक कंपन्यांची अवजड वाहतूकही विस्कळीत होणार असल्याने उद्योजकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
महत्त्वाची सूचना: प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी वेळेचे नियोजन करावे आणि प्रशासनाने दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:46 27-03-2026














