रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित कामांसाठी आवाज उठवणे माजी सभापतींसह त्यांच्या सहकाऱ्यांना महागात पडले आहे. निवळी तिठा येथे पुलाचे काम, सर्व्हिस रोड आणि बोगद्याच्या मागण्यांसाठी विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी माजी सभापती पर्शुराम कदम यांच्यासह तिघांवर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर निवळी गावातील पुलाचे काम, सर्व्हिस रोड आणि बोगद्याच्या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थांमध्ये मोठा असंतोष आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास निवळी तिठा येथे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी सुमारे २० ते २५ ग्रामस्थांना एकत्र जमवून भाषणे व मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांनी १८ मार्च रोजी काढलेल्या आदेशानुसार, १९ मार्च ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), (३) अन्वये मनाई आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमणे, सभा घेणे किंवा आंदोलन करण्यास बंदी आहे. या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार परेश रघुनाथ भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खालील व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे: १. पर्शुराम मारुती कदम (रा. हातखंबा) २. मुन्ना देसाई ऊर्फ केदार मधुसूदन देसाई (रा. हातखंबा) ३. राजेश विनायक सावंत (रा. रत्नागिरी)
या तिघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असंतोष कायम, पण कारवाईचा बडगा
महामार्गावरील कामांमुळे स्थानिकांना होणारा त्रास आणि त्यातून निर्माण झालेला असंतोष तीव्र असला तरी, प्रशासकीय नियमांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 28-03-2026














