देवरूख फिश मार्केटसाठी जागा निश्चित करावी : मंत्री नितेश राणे

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवरूख नगरपंचायत कार्यक्षेत्रात फिश मार्केटसाठी योग्य जागा लवकरात लवकर निश्चित करून प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. तसेच लवकरच भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअनतर्गत देवरूख नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मत्स्यबाजार (फिश मार्केट) विकसित करण्याबाबत आढावा बैठक मुंबईत घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, मुख्याधिकारी प्रशांत भोसले तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल उपस्थित होते.

मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले की, फिश मार्केटचे नियोजन करताना स्थानिक नागरिक व मच्छी विक्रेत्यांच्या सोयीचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी आधुनिक बाजारपेठ उभारल्यानंतरही पारंपरिक ठिकाणे सोडून विक्रेते नव्या ठिकाणी जात नाहीत. त्यामुळे नवीन बाजारपेठेची जागा निवडताना लोकांची ये-जा आणि सवयी लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रशासनाने जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नगरपंचायत पातळीवर समन्वय साधून जागा निश्चित करावी, तसेच एस्टिमेट, प्रस्ताव आणि तांत्रिक मान्यता प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. मत्स्यव्यवसाय विभागाकडून आवश्यक त्या सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असेही मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:31 28-03-2026