पार्थ पवारांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट

मुंबई: दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली, मात्र भेटीनंतर पार्थ पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने या भेटीचे गूढ अधिकच वाढले आहे.

अजितदादांचा अपघात आणि राज ठाकरेंची भूमिका

काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सविस्तर चर्चा झाली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली होती. “अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याचा अपघात होतो आणि सरकार साधा एफआयआर (FIR) का नोंदवत नाही?” असा संतप्त सवाल राज यांनी विचारला होता. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

राजकीय पुनर्वसन आणि राज्यसभेची उमेदवारी

येत्या २ एप्रिल रोजी राज्यसभेच्या ७ जागा रिक्त होत आहेत. यातील एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांना संधी दिली असून, त्यांची निवड बिनविरोध होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर आणि राज्यसभेवर वर्णी लागल्यानंतर पार्थ पवार पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले होते.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा वाद आणि राज ठाकरेंचा ‘मराठी’ कार्ड

अजित पवारांच्या अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा पेच निर्माण झाला होता. त्यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी प्रफुल पटेल यांच्या नावाचा दावा केला होता. मात्र, राज ठाकरे यांनी तत्काळ भूमिका मांडली की, “राष्ट्रवादीसारख्या मराठमोळ्या पक्षाचा अध्यक्ष मराठीच असावा; तो पाटील असावा, पटेल नाही!” राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतरच सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती.

भेटीमागची संभाव्य कारणे:

१. अपघाताची चौकशी: वडिलांच्या (अजित पवार) विमान अपघाताच्या चौकशीबाबत राज ठाकरेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेबद्दल आभार मानण्यासाठी ही भेट असू शकते. २. राजकीय सदिच्छा भेट: राज्यसभेवर निवड निश्चित झाल्याने ज्येष्ठ नेता म्हणून राज ठाकरेंचे आशीर्वाद घेण्यासाठी पार्थ पवार गेले असावेत. ३. नवे राजकीय समीकरण: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे काही नवी राजकीय समीकरणे आकाराला येत आहेत का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पार्थ पवार शिवतीर्थावरून बाहेर पडताना त्यांच्या चेहऱ्यावर गांभीर्य होते आणि त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणे टाळले. त्यामुळे या दीड तासाच्या चर्चेत नेमके काय शिजले, हे येणारा काळच ठरवेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:31 30-03-2026