रत्नागिरीत हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष! मारुती आळीत आजपासून विधीवत सोहळ्याला सुरुवात; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

रत्नागिरी (प्रतिनिधी):

कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या रत्नागिरी शहरातील बाजारपेठेचे आराध्य दैवत असलेल्या श्री मारुती मंदिर संस्था (मारुती आळी) येथे आजपासून हनुमान जन्मोत्सव २०२६ या भव्य सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. मंगळवार, ३१ मार्च ते शनिवार, ४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आजपासून उत्सवाचा प्रारंभ

आज, मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता हनुमान यागाने या उत्सवाचा श्रीगणेशा झाला आहे. या सोहळ्यासाठी मारुती आळी परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला असून भाविकांची मांदियाळी जमू लागली आहे.

महत्त्वाचे कार्यक्रम आणि कीर्तन सेवा

  • बुधवार, १ एप्रिल (श्रींचा वाढदिवस): सकाळी पूजाअर्चा, लघुरुद्र आणि अभिषेक होईल. सायंकाळी ५:०० वाजता बीड येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री. लक्ष्मीप्रसाद कुलकर्णी (पटवारी) यांचे कीर्तन रंगणार आहे. रात्री ९:०० वाजता पारंपारिक भोवत्यांचा कार्यक्रम होईल.
  • गुरुवार, २ एप्रिल (मुख्य जन्मोत्सव सोहळा): पहाटे ५:०० वाजता जन्मोत्सवाचे विशेष कीर्तन होईल. सकाळी ६ वाजून ३९ मिनिटांनी श्रींचा मुख्य जन्मकाळ सोहळा संपन्न होईल. दुपारी छप्पन्न भोग नैवेद्य दाखवण्यात येईल.

भव्य रथोत्सव आणि सांस्कृतिक मेजवानी

हनुमान जन्मोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेली श्रींची भव्यदिव्य रथोत्सव मिरवणूक गुरुवार, २ एप्रिल रोजी सायंकाळी ५:०० वाजता निघणार आहे. या मिरवणुकीत स्थानिक भजन मंडळांची सेवा रुजू होणार आहे. शुक्रवारी, ३ एप्रिल रोजी दुपारी १२:०० ते ३:०० या वेळेत सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक आकर्षणे:

दिनांकवेळकार्यक्रम
१ एप्रिलसायं. ७:३०भक्ती संध्या: श्री. ओमकार संसारे यांचा सुश्राव्य भक्ती गीतांचा कार्यक्रम
२ एप्रिलसकाळी १०:००भजन: श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, केळये (बुवा – उदय मेस्त्री)
२ एप्रिलसायं. ६:००भजन: श्री भैरव प्रा. भजन मंडळ, मुरुगवाडा (बुवा – अजयराव पिलणकर)
३ एप्रिलरात्रौ १०:००लळीताचे कीर्तन: ह.भ.प. श्री. लक्ष्मीप्रसाद कुलकर्णी (पटवारी)

शनिवार, ४ एप्रिल रोजी सकाळी लघुरुद्राने या ५ दिवसीय उत्सवाची सांगता होणार आहे. तरी सर्व रत्नागिरीकर भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री मारुती मंदिर संस्थेचे अध्यक्ष व समस्त ग्रामस्थांनी केले आहे.