दापोलीत विवाहितेचा हुंड्यासाठी छळ; १० तोळे सोन्यासह १ लाख ३० हजारांची फसवणूक, ५ जणांवर गुन्हा दाखल

दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरातून छळाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी एका २७ वर्षीय विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी विवाहितेचे १० तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हडप केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.


छळ आणि जीवे मारण्याची धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा विवाह ९ नोव्हेंबर २०२४ रोजी झाला होता. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच आरोपींनी हुंड्यासाठी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. ९ नोव्हेंबर २०२४ ते ८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नशेमन कॉलनी (जोगळे, दापोली) आणि पुणे येथे हा प्रकार घडला.

आरोपींनी महिलेला केवळ क्रूर वागणूकच दिली नाही, तर “हा प्रकार कोणाला सांगितल्यास किंवा पळून गेल्यास जीवे ठार मारू,” अशी धमकीही दिली. या सततच्या त्रासामुळे पीडित विवाहितेने अखेर पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली आहे.

सोन्याचे दागिने आणि रोकड हडपली

लग्नाच्या वेळी फिर्यादी यांना मिळालेले १० तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम आरोपींनी स्वतःच्या ताब्यात ठेवून त्याचा अपहार केला. मालमत्ता सुपूर्द करण्यास प्रवृत्त करून विश्वासघात केल्याचा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे.

या पाच जणांवर गुन्हा दाखल

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे: १) मंजूर शकील दळवी (पती) २) ममताज शकील दळवी ३) शकील दिलावर दळवी ४) मेहनाज वाहिद महाडीक ५) कमरजहॉन शादाब मुजावर

(सर्व राहणार: नशेमन कॉलनी, भारत नगर, जोगळे, ता. दापोली, जि. रत्नागिरी)

भारतीय न्यायसंहितेनुसार कारवाई

दापोली पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये प्रामुख्याने कलम ८५ (विवाहित महिलेचा छळ), ३१६(२) (विश्वासघात), ३१८(४) (फसवणूक), ११५(२), ३५१(२) (धमकावणे), ३५२ आणि ३(५) या कलमांचा समावेश आहे. ३० मार्च २०२६ रोजी दुपारी ४ वाजता हा गुन्हा अधिकृतपणे दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.