राजापूर (रत्नागिरी): रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातून एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. पत्नीसोबत दुचाकीवरून मूळ गावी जाणाऱ्या एका ३८ वर्षीय शेतकऱ्याला तळवडे येथील खिंडीत भररस्त्यात अडवून पैशाच्या देवाणघेवाणीवरून लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली आहे. या हल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून, त्याच्या पत्नीसमोरच त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेले माहितीनुसार, फिर्यादी गणेश आत्माराम आर्डे (वय ३८, व्यवसाय-शेती, सध्या रा. पाचल बाजारवाडी, मूळ रा. काजिर्डा पाटीलवाडी, राजापूर) हे सोमवार, दिनांक ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ९:१५ वाजताच्या सुमारास पत्नी प्रियंका गणेश आर्डे यांच्यासह दुचाकीवरून आपल्या मूळ गावी काजिर्डा येथे जात होते.
सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास तळवडे येथील खिंडीत ते आले असता, मागून आलेल्या एका अनोळखी मोटरसायकलस्वाराने (वय अंदाजे ३५ वर्षे) गणेश आर्डे यांच्या दुचाकीसमोर आपली गाडी आडवी लावून त्यांना थांबण्यास भाग पाडले.
पैशाचा वाद आणि मावस भावाचा हल्ला
गाडी थांबवताच, अनोळखी इसमासोबत आलेला गणेश आर्डे यांचा मावस भाऊ पांडुरंग गुणाजी पाटेकर (वय ३७, रा. कोळंब, राजापूर) याने पैशाच्या देवाणघेवाणीच्या जुन्या कारणावरून वाद उकरून काढला. संतापाच्या भरात पांडुरंगने त्याच्या हातातील लाकडी दांड्याने गणेश यांच्या उजव्या हातावर जोरात वार केला, ज्यात ते जखमी झाले.
साथीदारांकडून लोखंडी रॉड आणि बांबूने मारहाण
यावेळी पांडुरंगसोबत असलेले इतर दोन अनोळखी इसमही हल्ल्यात सामील झाले. त्यापैकी राखाडी रंगाचा शर्ट घातलेल्या इसमाने (वय सुमारे ३५ वर्षे) गणेश यांच्या पाठीवर लोखंडी रॉडने जबर प्रहार केला. तर, पांढऱ्या रंगाचा चौकडा शर्ट घातलेल्या दुसऱ्या इसमाने (वय सुमारे ३० वर्षे) लाकडी बांबूने गणेश यांच्या पायावर बेदम मारहाण केली.
या तिघांनी गणेश आर्डे यांना भररस्त्यात घाणेरडी शिवीगाळ केली आणि त्यांची पत्नी प्रियंका यांच्यासमोरच त्यांना “तुला जीवे ठार मारू,” अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
हल्ल्यानंतर जखमी गणेश आर्डे यांनी ३० मार्च २०२६ रोजी रात्री ८:२२ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
आरोपींची माहिती: १) पांडुरंग गुणाजी पाटेकर (वय ३७, रा. म.पो. कोळंब, ता. राजापूर) २) अनोळखी इसम (नाव-गाव माहित नाही, वय अंदाजे ३५) ३) अनोळखी इसम (नाव-गाव माहित नाही, वय अंदाजे ३०)
दाखल कलमे: याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ च्या कलम ११८(१) (घटक हत्यारांनी गंभीर दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान), ३५१(१) (गुन्हेगारी स्वरूपाची धमकी), आणि ३(५) (सामूहिक गुन्हेगारी) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ७७/२०२६ नुसार दाखल केला आहे.
परिसरात भीतीचे वातावरण
तळवडे खिंडीसारख्या वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे राजापूर तालुक्यात, विशेषतः पाचल आणि कोळंब परिसरात खळबळ उडाली आहे. पैशाच्या वादातून नातेवाईकानेच सुपारी देऊन किंवा साथीदारांना घेऊन असा प्राणघातक हल्ला केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राजापूर पोलीस अनोळखी दोन आरोपींचा शोध घेत असून, पुढील तपास सुरू आहे.













