रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली वादळी ठरली. प्रशासक काळात पूर्ण झालेल्या तीन संशयास्पद कामांबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, वारंवार मुदतवाढ देऊनही कामे पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना थेट ‘काळ्या यादीत’ (Blacklist) टाकण्याचा महत्त्वपूर्ण ठराव या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
प्रशासक काळातील ‘ती’ ३ कामे रडारवर
नगर परिषदेत चार वर्षांच्या प्रशासक काळानंतर नवीन पदाधिकारी सत्तेवर आले आहेत. प्रशासक काळात झालेली तीन कामे मंजुरीसाठी सभेसमोर आली होती, मात्र या कामांवरून मोठा पेच निर्माण झाला आहे.
- वादग्रस्त कामे: आठवडा बाजार येथील शौचालय सुशोभिकरण, पेव्हर ब्लॉक बसवणे आणि व्यायामशाळेचे काम.
- अपात्रतेची टांगती तलवार: ही कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांना मंजुरी दिल्यास नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी याविरोधात कायदेशीर तयारीही केली होती.
- प्रदीप साळवींची भूमिका: शिवसेनेचे सदस्य प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी स्पष्ट केले की, ही कामे प्रशासक काळात झाली असल्याने यात नगरसेवकांचा संबंध नाही. प्रशासनाने याचा स्पष्ट अहवाल द्यावा, त्यानंतरच मंजुरीचा निर्णय घेतला जाईल. मुख्याधिकारी वैभव गारवे यांनीही याला संमती दर्शवली आहे.
कामचुकार ठेकेदारांना दणका
शहरातील विविध विकासकामांना मुदतवाढ देऊनही ती वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाले.
- दंडात्मक कारवाई: अशा ठेकेदारांना प्रथम दंडाची नोटीस बजावण्यात येईल.
- ब्लॅक लिस्ट: नोटीस देऊनही काम लांबवणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा ठराव बंड्या साळवी आणि राजन शेट्ये यांनी मांडला, ज्याला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली.
मच्छी मार्केट आणि रिक्षा स्टॉपचा प्रश्न सुटणार
बाजारपेठेतील मच्छी मार्केटच्या इमारतीसमोर रिक्षा स्टॉप असल्याने व्यापारी गाळे घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे हा रिक्षा स्टॉप तलावासमोर स्थलांतरित करण्याचा ठराव सभापती विजय खेडेकर यांनी मांडला. तसेच, त्या ठिकाणी असलेला बेकायदेशीर घोड्यांचा तबेला हटवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. नगरपालिकेच्या नवीन इमारतीमधील गाळ्यांतून उत्पन्न मिळावे यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी सूचना निमेश नायर यांनी केली.
सभेतील इतर महत्त्वाचे निर्णय:
- मांडवी प्रवेशद्वार: येथील वापरात नसलेली पाण्याची टाकी काढून टाकली जाणार.
- परटवणे पूल: पुलाच्या जोडरस्त्यासाठी खासगी जागामालकांची संमती तातडीने मिळवण्याचे निर्देश.
- विकास योजना: मंजूर शहर सुधारित विकास योजनेतील नियोजित रस्ता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार.
- स्वच्छता मोहीम: नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी रत्नागिरी शहर कचरा आणि प्लास्टिकमुक्त करण्याचे आवाहन केले.
‘त्या’ वादावर पडदा
उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर आणि नगर अभियंता यतिराज जाधव यांच्यात २२ जानेवारी रोजी झालेला शिविगाळ प्रकरणाचा वाद अखेर मिटला आहे. अभियंता जाधव यांनी सभेत जाहीर दिलगिरी व्यक्त केली. “अधिकारी दोन पावले पुढे येत असतील तर आपणही एक पाऊल मागे घेऊ,” अशी भूमिका निमेश नायर यांनी मांडल्याने या प्रकरणावर पडदा पडला.
सहभागी नगरसेवक: राजन शेट्ये, सौरभ मलुष्टे, विजय खेडेकर, समीर तिवरेकर, राजू तोडणकर, निमेश नायर, अमित विलनकर, केतन शेट्ये, सुप्रिया रसाळ, मानसी करमरकर, वैभवी खेडेकर आणि नितीन जाधव.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 31-03-2026













