मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे वारे शांत होत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. पक्षाचे संघटन तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने लोकसभा संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
या नियुक्त्यांद्वारे एकनाथ शिंदे यांनी अनुभवी नेत्यांवर राज्यातील विविध विभागांची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
शिवसेना विभागीय संपर्कप्रमुख यादी
राज्यातील महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी खालील नेत्यांकडे देण्यात आली आहे:
| विभाग | कार्यक्षेत्र (जिल्हे) | नियुक्त नेते |
| दक्षिण कोकण | रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग | किरण सामंत |
| उत्तर कोकण | रायगड आणि पालघर | भरतशेठ गोगावले |
| पश्चिम महाराष्ट्र | पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर | दगडू दादा सकपाळ |
| मराठवाडा | धाराशिव, लातूर, बीड आणि नांदेड | प्रकाश आबिटकर |
| पूर्व विदर्भ – १ | नागपूर, भंडारा आणि गोंदिया | डॉ. दीपक सावंत |
| पूर्व विदर्भ – २ | वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली | डॉ. मनीषा कायंदे |
| पश्चिम विदर्भ | अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा | संजय राठोड |
शिवसेना विभागीय सह-संपर्कप्रमुख
| विभाग | कार्यक्षेत्र | नियुक्त नेते |
| उत्तर कोकण | रायगड आणि पालघर | प्रदीप (भाई) खाडे |
| पश्चिम महाराष्ट्र | पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर | हनुमंत जगदाळे |
| पश्चिम विदर्भ | अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा | पराग पिंगळे |
काय आहे एकनाथ शिंदेंचा ‘फ्युचर प्लॅन’?
निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर विश्रांती न घेता एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना तातडीने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- संघटनात्मक बांधणी: लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाची पकड अधिक घट्ट करणे.
- योजनांचा प्रचार: राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवणे.
- कार्यकर्त्यांचे जाळे: तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क प्रस्थापित करणे.
‘ऑपरेशन तुतारी’ला भाजपकडून ‘रेड सिग्नल’?
एकीकडे शिंदे गट संघटना मजबूत करत असतानाच दुसरीकडे राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन तुतारी’ संदर्भात मोठी चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटातील ६ आणि उद्धव ठाकरे गटातील ६ अशा एकूण १२ खासदारांना फोडून शिंदेंनी आपली ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढवण्याची रणनीती आखली होती.
मात्र, या योजनेला भाजपकडून अद्याप ‘ग्रीन सिग्नल’ मिळालेला नाही. तुतारी गटातील खासदारांना एनडीएमध्ये (NDA) यायचे असल्यास त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या माध्यमातून यावे, असा सल्ला भाजपकडून देण्यात आल्याचे समजते. तसेच, शिंदेंच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात अमित शाह यांची भेट होऊ शकली नसल्याचीही माहिती समोर येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 31-03-2026













