रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरू असलेल्या अवैध एलईडी मासेमारीविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने काल मध्यरात्री एक अत्यंत धाडसी आणि मोठी मोहीम फत्ते केली आहे. जयगड बंदराच्या परिसरात उग्र लाटांचा सामना करत आणि सुमारे तासभर थरारक पाठलाग करून विभागाने ३ एलईडी नौका रंगेहाथ पकडल्या आहेत. प्रतिकूल हवामानात पार पडलेली ही कारवाई जिल्हयातील आतापर्यंतची एक ‘रेकॉर्डब्रेकिंग’ मोहीम मानली जात आहे.
गुप्त रणनीती आणि धाडसी मोहीम
गेल्या काही दिवसांपासून जयगड परिसरात रात्रीच्या अंधारात एलईडी लाईटचा वापर करून मासळीची लूट सुरू असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. गस्ती नौकेसाठी डिझेल उपलब्ध नसल्याच्या अफवा पसरल्याने अवैध मासेमार निर्धास्त झाले होते. मात्र, मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त श्री. सागर कुवेसकर यांनी अत्यंत गुप्तपणे रणनीती आखली. तातडीने डिझेलची व्यवस्था करून कोणतीही चाहूल लागू न देता गस्ती नौका जयगडच्या दिशेने वळवण्यात आली.
१ तासाचा थरारक पाठलाग
मध्यरात्रीच्या गडद अंधारात आणि जोरदार वाऱ्यात ५ परवाना अधिकाऱ्यांच्या पथकाने समुद्रात झेप घेतली. सरकारी नौका जवळ येत असल्याचे पाहताच एका एलईडी नौकेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने जिद्दीने आणि जिवाची पर्वा न करता समुद्रातील उग्र लाटांवर स्वार होत तब्बल १ तास पाठलाग केला. अखेर त्या नौकेला वेढा घालून शरण येण्यास भाग पाडले.
जप्त करण्यात आलेल्या नौकांचा तपशील:
या कारवाईत खालील ३ नौका ताब्यात घेण्यात आल्या आहेत:
- एच. इम्तियाज (IND-MH-4-MM-1961) – मालक: इम्तियाज हाजी हसनमिया मुकादम.
- लक्ष्मी (IND-MH-4-MM-506) – मालक: लीना लक्ष्मण बिरजे.
- अक्सा इम्रान (IND-MH-4-MM-1971) – मालक: अब्दुल लतीफ अली होडेकर.
या अधिकाऱ्यांनी लावली जिवाची बाजी
ही संपूर्ण कारवाई रत्नागिरीचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त श्री. सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत सहभागी असलेले पथक:
- परवाना अधिकारी: चिन्मय जोशी (रत्नागिरी), पार्थ तावडे (साखरीनाटे), स्वप्नील चव्हाण (गुहागर), दीप्ती साळवी (दाभोळ), स्मितल कांबळे (जयगड).
- सुरक्षा पथक: तुषार कर्गुटकर, विनायक शिंदे, सुजन पवार आणि साईनाथ साळवी.
अवैध मासेमारांना कडक इशारा
विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध एलईडी मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. समुद्रातील जैवविविधतेचा नाश करणाऱ्या अशा अवैध कृत्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 31-03-2026













