रजेचा अर्ज मुंबईला पाठवल्याच्या रागातून जयगड लाईट हाऊस येथील नौचालन सहायकास मारहाण

रत्नागिरी : रजेचा अर्ज मुंबईला पाठवल्याच्या रागातून तालुक्यातील जयगड लाईट हाऊस येथील नौचालन सहायकास तेथील सफाई कामगाराने काठीने मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वा. घडली.

गजानन नंदकुमार माने (४८, रा. जयगड सडेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सफाई कामगाराचे नाव आहे. त्याच्याविरोधात अजित कुमार गुप्ता (२९, मुळ रा. उत्तरप्रदेश सध्या रा. जयगड लाईट हाऊस नांदिवडे, रत्नागिरी) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, मंगळवारी सकाळी संशयित गजानन माने हा लाईट हाऊसमध्ये आला आणि त्याने अजित गुप्ताला तुम्ही माझ्या रजेबद्दल मुंबईला का कळवले, यापूर्वी असे कधी झाले नसल्याबाबत विचारणा केली. तेव्हा अजित गुप्ताने त्याला ३ दिवस रजा देण्याचा मला अधिकार आहे. त्यावर रजा हवी असल्यास मला वरिष्ठांना कळवावे लागते मी तुला रजेसाठी अडवलेले नाही, असे सांगितले. या गोष्टीचा राग आल्याने गजानन मानेने अजित गुप्ताला शिवीगाळ व धक्काबुक्की करत ठार मारण्याची धमकी दिली. त्या नंतर ऑफिसच्या दरवाजाजवळील काठी फिर्यादीच्या डोक्यात मारुन दुखापत केली. याप्रकरणी संशयिताविरोधात भारतीय न्याय संहिता ३५ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:37 PM 31/Oct/2024