नवी दिल्ली/मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) एप्रिल ते जून २०२६ या तीन महिन्यांचा हवामान अंदाज वर्तवला असून, यंदा उन्हाळा अधिक कडक राहण्याची चिन्हे आहेत. पूर्व, मध्य आणि वायव्य भारतासह आग्नेय द्वीपकल्पीय प्रदेशात नेहमीपेक्षा जास्त दिवस उष्णतेच्या लाटा (Heatwaves) येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्रासाठी काही अंशी दिलासादायक माहिती समोर आली आहे.
तापमानाची स्थिती: कुठे पारा चढणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी तीन महिन्यांत देशाच्या अनेक भागांत कमाल तापमान ‘सामान्य’ राहण्याची अपेक्षा असली तरी, काही राज्यांना भीषण उष्णतेचा तडाखा बसणार आहे.
- उष्णतेचा तडाखा: पूर्व आणि ईशान्य भारत, मध्य भारताचा पूर्व भाग आणि द्वीपकल्पीय प्रदेशात कमाल तापमान ‘सामान्यपेक्षा जास्त’ राहील. या भागात उष्णतेच्या लाटेचे प्रमाण वाढणार आहे.
- सामान्य तापमान: देशाच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी
देशाच्या बहुतांश भागांत किमान तापमान ‘सामान्यपेक्षा जास्त’ राहण्याचा अंदाज असताना, महाराष्ट्राला मात्र थोडा दिलासा मिळू शकतो.
- अपवाद: महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या काही प्रदेशांमध्ये किमान तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत या भागात रात्रीचा उकाडा काहीसा मर्यादित राहू शकतो.
एप्रिलमध्ये पावसाची हजेरी!
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाचा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. आयएमडीने स्पष्ट केले आहे की:
- सरासरीपेक्षा जास्त पाऊस: एप्रिल २०२६ मध्ये संपूर्ण देशात सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता आहे.
- ईशान्य भारताला हुलकावणी: ईशान्य भारतात मात्र पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रशासकीय गजबज: ४ दिवसांत ९५१ जीआर (GR)
हवामानासोबतच सध्या राज्य प्रशासनातही मोठ्या घडामोडी घडत आहेत. सलग तीन दिवस सुट्ट्या असतानाही राज्य सरकारचे प्रशासन ‘ऑन ड्युटी’ असल्याचे दिसून आले. गेल्या अवघ्या चार दिवसांत तब्बल ९५१ शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले आहेत. विकासकामांचा वेग वाढवण्यासाठी आणि तातडीच्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणा रात्रंदिवस कार्यरत असल्याचे चित्र आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 01-04-2026














