Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ

मुंबई: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ई केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत वाढवत आहोत, अशी माहिती दिली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीसाठी यापूर्वी 31 मार्चपर्यंत होती. आता ही मुदत एक महिन्यानं वाढवण्यात आली आहे, असं आदिती तटकरेंनी म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुचनेनं मुदतवाढ देण्यात येत असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या. राज्यातील लाडक्या बहिणींना ई केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी देण्यात येत असल्याचं आदिती तटकरेंनी म्हटलं. महाराष्ट्र सरकारकडून जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ दरमहा 1500 रुपयांप्रमाणं महिलांना दिला जातो. आता लाडक्या बहिणींना ई केवायसी दुरुस्तीसाठी आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरणी आदिती तटकरे काय म्हणाल्या?

भोंदू अशोक खरात प्रकरणावरुन केली जाणारी टीका अतिशय दुर्दैवी आहे. मी ज्यावेळी हे प्रकरण झालं तेव्हा सर्व प्रथम प्रतिक्रिया देणाऱ्यांपैकी मी एक होते, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन केलेली आहे. एसआयटीच्या प्रमुख अनुभवी महिला पोलीस अधिकारी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे. ज्या महिलांवर अन्याय झाला, पीडित महिलांना न्याय देणं महत्त्वाचं आहे. जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं आदिती तटकरेंनी म्हटलं.

आदिती तटकरे विलिनीकरणावर काय म्हणाल्या?

सुनील तटकरे यांनी दादा असतानाचं विलिनीकरण आणि दादा पश्चातचं विलिनीकरण या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत, असं म्हटलं होत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. सुरुवातीच्या कालावधीत जो काही सबंध आवाज करण्यात आला विलिनीकरण, विलिनीकरण, दादांची शेवटची इच्छा, त्यावेळेला खऱ्या अर्थानं दादांचा झालेला अपघात त्या सगळ्या परिस्थितीत विलिनीकरणाची चर्चा सुरु झाली त्यातून संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये संघटितपणे चर्चा झाली होती. तशा पद्धतीनं चर्चा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा झाली नव्हती. आदरणीय सुनेत्राकाकींना दादांच्या पश्चात राष्ट्रीय अध्यक्ष करु असं कोणी म्हटलं नाही, त्यांच्या नेतृत्त्वात सगळे काम करु अशी भूमिका समोर आली नाही. त्यामुळं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:07 01-04-2026